पुणे : बुस्टर डोसचे प्रमाण सामान्यांमध्ये वाढले; सर्वसामान्य जनतेमध्ये जागृती

पुणे : बुस्टर डोसचे प्रमाण सामान्यांमध्ये वाढले; सर्वसामान्य जनतेमध्ये जागृती

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : कोरोनाची भीती नसली, तरी सुरक्षिततेचा उपाय म्हणून सामान्यांमध्ये बुस्टर डोस घेण्याबाबत सजगता वाढली आहे. दररोज बुस्टर घेणा-यांची संख्या 800 ते 1000 इतकी झाली आहे. मात्र, आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी बॅकफूटवर असून त्यांच्यात बुस्टर डोस घेणा-यांची दररोजची संख्या अवघी 30 ते 40 इतकीच आहे. पुण्यात आतापर्यंत 38 लाख 85 हजार जणांनी पहिला तर 32 लाख 67 हजार जणांनी दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत 73 हजारांहून अधिक आरोग्य कर्मचार्‍यांनी पहिला तर 66 हजारांहून अधिक जणांनी दुसरा डोस घेतला आहे. बुस्टर डोसचा आकडा अजून 30 हजारांच्या पुढेही गेलेला नाही. फ्रंटलाईन वर्कर्स यामध्ये अधिक मागे आहेत. पहिला डोस 95 हजार 600 आणि दुसरा डोस 93 हजार 800 कर्मचार्‍यांनी घेतला आहे. पण, बुस्टर डोस घेणार्‍यांची संख्या जेमतेम 36 हजारांच्या जवळपास आहे.

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यांमध्ये दररोज बुस्टर घेणा-यांची संख्या 10 ते 60 एवढीच होती. त्यानंतर 20 डिसेंबरपासून बुस्टर डोस घेणा-यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. गेल्या दहा-बारा दिवसांमध्ये 24 डिसेंबर रोजी सर्वाधिक 1382 नागरिकांनी बुस्टर डोस घेतल्याचे पहायला मिळाले. शासकीय लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सिनची लस उपलब्ध आहे. पहिले दोन डोस कोव्हिशिल्ड लसीचे घेतले असले तरी तिसरा डोस कोव्हॅक्सिनचा घेतला तरी प्रभावी ठरत असल्याचे डॉक्टरांनी अधोरेखित केले आहे.

चौथ्या डोसची घोषणा फेब्रुवारीत ?
पहिल्या दोन डोसमध्ये 28 दिवसांचे तर दुस-या आणि तिस-या डोसमध्ये 6 महिन्यांचे अंतर असावे, असे मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगण्यात आले आहे. अनेक सजग नागरिकांनी वेळच्या वेळी तिन्ही डोस पूर्ण केले आहेत. काहींना बुस्टर डोस घेऊन सहा-नऊ महिने उलटून गेले आहेत. जगभरात झालेल्या अभ्यासानुसार, लसीचा बुस्टर डोस घेतल्यानंतर साधारणपणे वर्षभर अँटिबॉडी टिकतात. त्यामुळे चौथा डोस सुरू करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. फेब—ुवारी महिन्यात चौथ्या डोसची घोषणा केली जाऊ शकते, असा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांसाठी चौथा डोस सुरू केला जाऊ शकतो.

शहरातील बुस्टर डोस लसीकरण
दिवस           संख्या

20 डिसेंबर – 108
21 डिसेबर – 469
22 डिसेंबर – 855
23 डिसेंबर – 1382
24 डिसेंबर – 514
25 डिसेंबर – 732
26 डिसेंबर – 719
27 डिसेंबर – 619
28 डिसेंबर – 631
29 डिसेंबर – 622
30 डिसेंबर – 642
31 डिसेंबर – 657

लसीकरणाची स्थिती 

पहिला डोस- दुसरा डोस- बुस्टर डोस
आरोग्य कर्मचारी 73,287 66,384 29,474
फ्रंटलाईन वर्कर्स 95,692 93,880 35,701
एकूण लसीकरण 38,85,720 32,67,745 5,40,931

सध्या शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये कोव्हॅक्सिन लस मिळत आहे. आरोग्य कर्मचारी किंवा फ्रंटलाईन वर्कर यांनी आपणहून डोस घेणे आवश्यक आहे. तसेच, सामान्य नागरिकांनीही लसीकरण करून घेण्यास प्राधान्य द्यावे.

                                                                    – डॉ. सूर्यकांत देवकर,
                                                                 मुख्य लसीकरण अधिकारी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news