गोव्यात पुन्हा ‘कमळ’; ‘पंजा’साठी ‘पणजी’ दूरच

गोव्यात पुन्हा ‘कमळ’; ‘पंजा’साठी ‘पणजी’ दूरच

पणजी; वृत्तसंस्था : पाच राज्यांच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात विधानसभा निवडणुकांची पूर्वतयारीही सुरू झाली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी एक जनमत सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यात चौरंगी लढतीत भाजप यशस्वी होईल, असा अंदाज वर्तविण्यात आलाआहे.

सर्वेक्षणानुसार, गोवा विधानसभेसाठी चौरंगी लढत रंजक आणि चुरशीचीही होईल; पण निवडणुकीअंती पुन्हा भाजपचेच सरकार स्थापन होण्याची चिन्हे आहेत. सत्तास्थापनेसाठी जादुई आकडा पूर्ण करण्यात आम आदमी पक्ष मोठी भूमिका बजावेल. 'आप' गोव्यात किंगमेकरही ठरू शकतो. 'आप'ला 7 ते 11 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 'आप' मुख्य विरोधी पक्ष म्हणूनही पुढे येऊ शकतो, असे या सर्वेक्षणातील निष्कर्षांत नमूद केले आहे.

एका माध्यम संस्थेच्या (टाईम्स नाऊ नवभारत) सर्व्हेनुसार, आजच निवडणूक झाल्यास भाजपला गत निवडणुकीपेक्षा अधिक 18 ते 22 जागा मिळतील. सन 2017 मध्ये भाजपने 13 जागा जिंकल्या होत्या. तेव्हा 'आप'ला या राज्यात खातेही उघडता आले नव्हते. यावेळी मात्र 'आप'ला 7 ते 11 जागा मिळण्याची शक्यता आहे. गत निवडणुकीत सर्वाधिक 17 जागांवर विजयी होणार्‍या काँग्रेसला येत्या निवडणुकांमध्ये 4 ते 6 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. राज्यात जोरदार प्रवेश करणार्‍या तृणमूल काँग्रेसला अवघी 2 टक्के मते मिळतील, असे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. तृणमूलने गोव्यातील विविध पक्षांतील नेत्यांना आपल्यात सामावून घेतले आहे.

गोवा विधानसभेचा कार्यकाळ 15 मार्च रोजी संपणार आहे. गोव्यात एकूण 40 जागांवर निवडणुका होतील. लवकरच मतदानाच्या तारखा जाहीर होतील.

गत निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस असे दुरंगी चित्र होते. यावेळी भाजप, काँग्रेससह ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस आणि अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्षही मैदानात असणार आहे.

गेली 10 वर्षे गोव्यात भाजपची सत्ता आहे. 'अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर'चा सामना यावेळी भाजपला करावा लागेल. अर्थात, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. मनोहर पर्रिकर यांच्यानंतर गोव्यात भाजपच्या हरविलेल्या चेहर्‍याची उणीव भरून काढण्याचे त्यांनी कसोशीने प्रयत्न चालविले आहेत.

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही राज्यात पूर्ण ताकद लावलेली आहे. गत निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेस आपले सरकार राज्यात स्थापन करू शकली नव्हती. यावेळी सर्वेक्षणानुसार जागा निम्म्याने कमी होणार म्हटल्यावर 'पणजी अभी दूर है' अशीच स्थिती 'पंजा'ची असेल. त्यात काँग्रेसमधील अनेक नेते अन्य पक्षांत डेरेदाखल झालेले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news