भाजप-एनडीए राज्यसभेतही बहुमताच्या जवळ

भाजप-एनडीए राज्यसभेतही बहुमताच्या जवळ

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : राज्यसभेसाठी मंगळवारी झालेल्या मतदानाअंती भाजपला 2 अतिरिक्त जागांचा लाभ झालेला आहे. कर्नाटक, हिमाचल, उत्तर प्रदेशात 15 जागांसाठी ही निवडणूक झाली. या निकालाने राज्यसभेतही भाजप-एनडीए बहुमताच्या जवळ आलेले आहे. भाजपला राज्यसभेतील बहुमतासाठी आता अवघ्या 4 जागांची आवश्यकता आहे.

1989 पासून आजपर्यंत सर्व सरकारांना महत्त्वाची विधेयके राज्यसभेत मंजूर करून घेण्यासाठी त्या-त्या सरकारांना अन्य पक्षांचा आधार घ्यावा लागलेला आहे. भाजप सरकारही त्याला अपवाद नाही. मात्र आता राज्यसभेतील बहुमतासाठी भाजपला अवघ्या 4 जागांची गरज राहिलेली आहे. हिमाचलमध्ये एक आणि उत्तर प्रदेशमध्ये एक अशा 2 अतिरिक्त जागा भाजपला मिळाल्या.

नशीबही भाजपच्या बाजूने

हिमाचलमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांना समान मते मिळाली होती. ईश्वर चिठ्ठीद्वारे इथला निकाल लागला. काढलेली चिठ्ठी भाजप उमेदवाराच्या बाजूने गेली. नशीबही भाजपलाच अनुकूल ठरले. निवडणुकीनंतर हिमाचलमधील काँग्रेसचे सुक्खू सरकारही धोक्यात आले आहे. काँगे्रसच्या 6 आमदारांनी इथे भाजपला मतदान केल्याने सुक्खू सरकार आपोआपच अल्पमतात आले आहे. 2024 मध्ये राज्यसभेच्या एकूण 56 जागा रिक्त होत्या. त्यापैकी 41 जागांवर बिनविरोध निवडणूक झाली. वरीलप्रमाणे 3 राज्यांत 15 जागांसाठी मंगळवारी मतदान झाले. भाजपला 10, काँग्रेसला 3 आणि सपाला 2 जागा मिळाल्या.

उत्तर प्रदेशातील 'खेला'

उत्तर प्रदेशात भाजपचे 252 आमदार आहेत, मित्रपक्षांचे 34 आमदार आहेत. एकूण संख्या 286 आहे. सपाचे विधानसभेत एकूण 108 आमदार आहेत. एका जागेवर 37 मतांच्या हिशेबाने, भाजपकडे राज्यसभेच्या 7 जागांवर आपला उमेदवार निवडून आणण्याइतपत मते होती. सपाला आपले दोन उमेदवार सहज जिंकवता आले असते. एक जागा मात्र रिक्त राहिली असती. सात जागांवर विजय मिळेल इतकी मते असताना भाजपने 8 जागांवर उमेदवार उभे केले, तर सपानेही 2 जागांवर विजय मिळेल इतकी मते असताना 3 जागांवर उमेदवार उभे केले. सपाचे तिसरे उमेदवार आलोक रंजन आणि भाजपचे आठवे उमेदवार संजय सेठ यांच्यात थेट लढत झाली. भाजपला सर्व 8 उमेदवारांना विजयी करण्यासाठी एकूण 296 मतांची आवश्यकता होती, तर सपाला त्यांचे तीनही उमेदवार विजयी करण्यासाठी 111 मतांची गरज होती. भाजपला राजा भैया यांच्या जनसत्ता दलातील दोन आमदारांची आणि मायावतींच्या बसपामधील एकमेव आमदाराची मते मिळाली. याउपर भाजपला आणखी 7 आमदारांच्या मतांची गरज होती.

सपाच्या एकूण 7 आमदारांनी क्रॉस व्होटिंग करून ही गरज भरून काढली. त्यामुळे सपा तिसरी जागा जिंकण्यापासून वंचित राहिला आणि या जागेवर भाजपचा विजय झाला. कर्नाटकात राज्यसभेच्या 4 जागांसाठी मतदान झाले. राज्य विधानसभेच्या एकूण जागांची संख्या 224 आहे. राज्यसभा निवडणूक फॉर्म्युल्यानुसार, एक जागा जिंकण्यासाठी 45 आमदारांच्या पहिल्या पसंतीची मते आवश्यक होती. 4 जागांसाठी एकूण 5 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. काँग्रेसचे 3 तर भाजपचे 2 उमेदवार होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news