Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्राच्या 25 जागांवर भाजपच्या बैठकीत चर्चा

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्राच्या 25 जागांवर भाजपच्या बैठकीत चर्चा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सोमवारी (11 मार्च) भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची दुसरी बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि सर्व समिती सदस्य तसेच त्या त्या राज्यांतील प्रमुख नेते बैठकीला उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीत महाराष्ट्रातील जवळपास 25 जागांवर चर्चा झाल्याचे समजते. यामध्ये राज्यातील 25 जागांचे सादरीकरण करण्यात आले. (Lok Sabha Election 2024)

भाजपच्या दुसर्‍या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी सात राज्यांतील जवळपास 125-150 उमेदवारांच्या नावांवर मंथन झाले. सात राज्यांमध्ये कर्नाटक, बिहार, तेलंगणा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. 195 उमेदवारांची पहिली यादी 2 मार्चला जाहीर केल्यानंतर आता दुसरी यादी उद्या म्हणजे 12 मार्चला येण्याची शक्यता आहे. लोकसभेचे वेळापत्रक येण्यापूर्वी साधारण 300 उमेदवार जाहीर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. (Lok Sabha Election 2024)

यापूर्वी 29 फेब्रुवारीला भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली होती. त्यानंतर 2 मार्चला पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे 11 मार्चला दुसरी बैठक झाल्यानंतर उद्या किंवा परवा भाजपची दुसरी यादी येण्याची शक्यता आहे. साधारणतः निवडणूक आयोगाच्या वतीने आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय पक्ष उमेदवारी याद्या जाहीर करतात. भाजपने मात्र या गोष्टीला फाटा देत आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच आपली पहिली मोठी यादी घोषित केली. लवकरच दुसरी यादी येण्याची शक्यता आहे.

कोणाला मिळू शकते उमेदवारी?

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीपूर्वी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची दिल्लीत बैठक झाली. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते. या नेत्यांनी राज्यातील 24-25 जागांवर चर्चा करून केंद्रीय निवडणूक समितीला यादी सादर केली. या नावांमध्ये नितीन गडकरी, रावसाहेब दानवे-पाटील, भारती पवार, कपिल पाटील, संजयकाका पाटील या विद्यमान खासदारांसह राज्यातून मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news