अहमदाबाद, पुढारी ऑनलाईन : सत्तेत आल्यानंतर गुजरात राज्यात समान नागरी कायदा लागू केला जाईल, असे आश्वासन भारतीय जनता पक्षाने (भाजप) दिले आहे. शनिवारी भाजपने गुजरात राज्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला, यात हे आश्वासन दिले आहे. याशिवाय इतर ४० महत्त्वाची आश्वासने दिली आहेत. (BJP Manifesto promises uniform civil code)
गुजरात राज्यात समान नागरी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल, असे भाजपने म्हटले आहे. राज्यात मूलतत्त्ववाद विरोधी समिती स्थापन्याचे सूचनाही या समितीने केली आहे, त्याची अंमलबजावणी सत्तेत आल्यास करू असे भाजपने म्हटले आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री भुपेद्र पटेल, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, आणि प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. १ डिसेंबर आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यात गुजरातची निवडणूक होत आहे. पहिल्या टप्प्यात ८९ तर दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर मतदान होत आहे.
मुलीना पदव्युत्तरपर्यंत मोफत आणि दर्जेदार शिक्षण, गुणवान मुलांना दुचाकी, महिला ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस प्रवास, पाच वर्षांत महिलांना १ लाख रोजगार, २० हजार सरकारी शाळांचा अमुलाग्र बदल अशी विविध आश्वासने भाजपने दिली आहेत.
हेही वाचा