पुणे : भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक, सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून अज्ञाताने २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नावे कोथरुड भागातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली होती.
याबाबत गणेश बिडकर (वय ५०, रा. सोमवार पेठ) यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बिडकर गुरुवारी (३० मार्च) श्री रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सहभागी झाले होते. त्या वेळी बिडकर यांच्या मोबाइल क्रमांकावर एकाने (व्हाॅटसॲप काॅल) केला. बिडकर यांच्याकडे २५ लाखांची खंडणी मागितली. बिडकर यांना शिवीगाळ करुन दूरध्वनी करणाऱ्याने राजकीय कारकीर्द संपविण्याची धमकी दिली तसेच बदनामी करण्याची धमकी देण्यात आली. बिडकर यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.