सीताराम लांडगे
लोणी काळभोर : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तब्बल एकोणीस वर्षांनंतर होत आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने निवडणूक जिंकण्याची व्यूहरचना आखली असताना राष्ट्रवादीची भूमिका अद्याप गुलदस्तातच आहे. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पॅनेल होणार असल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत हवेली तालुक्यात घेतली तशी भूमिका ठेवल्यास पुन्हा त्याच निकालाची पुनरावृत्ती होऊन याचा फायदा भाजपलाच होण्यासारखी स्थिती आहे. 'जो निवडून येईल तो आमचा' ही अजित पवारांची दुटप्पी भूमिका या निवडणुकीत राष्ट्रवादीला घातक ठरणार आहे.
आशिया खंडातील सर्वांत मोठी समजली जाणारी हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तब्बल एकोणीस वर्षांनंतर होत आहे. अनेक वर्षे या बाजार समितीवर अजित पवार यांचे प्राबल्य राहिले आहे. लोकनियुक्त संचालक मंडळाव्यतिरिक्त प्रशासक व शासन नियुक्त संचालक मंडळाने या बाजार समितीवर कामकाज पाहिले आहे. काही काळाचा अपवाद वगळता अजित पवार यांचा एकहाती अंमल होता. 'ते बांधतील ते तोरण आणि ठरवतील ते धोरण' अशी स्थिती होती.
त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी हवेली बाजार समिती पुन्हा एकदा ताब्यात घेणे अत्यंत प्रतिष्ठेचे आहे. नेहमी राष्ट्रवादीसाठी एकतर्फी समजली जाणारी ही निवडणूक या वेळी सोपी नाही. भाजपने राष्ट्रवादीला तगडे आव्हान देण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौंडचे आमदार राहुल कुल, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, बाजार समितीचे माजी सभापती रोहिदास उंद्रे यांच्यावर जबाबदारी देऊन बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी चंग बांधला आहे.
भाजपकडून या निवडणुकीसाठी सर्व रसद पुरविण्यात येणार आहे. तालुक्यातील विविध कार्यकारी संस्थेच्या 137 सोसायट्यांच्या कार्यकारी मंडळांचे संचालक मतदार आहेत. या मतदारसंघात 11 संचालक आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघात 4 जागा आहेत, तर अडते व्यापारी मतदारसंघात 2 आणि हमाल-तोलणार मतदारसंघात 1 जागा आहे. या सर्व जागा जिंकून बाजार समिती ताब्यात घेणे अजित पवार यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेचे आहे.
अजित पवार यांनी जिल्हा बंकेच्या निवडणुकीसारखे 'जो निवडून येईल तो आमचा' हे धोरण या निवडणुकीत राबविले, तर याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनेलला बसणार, हे सहकारातील जाणकार सांगत आहेत. अजित पवार यांनी यापूर्वी सहकारातील हवेली तालुक्यातील सर्व निवडणुका मैत्रीपूर्ण लढत किंवा 'जो निवडून येईल तो आमचा' या धोरणाने लढविल्या आहेत. सध्याची परिस्थिती वेगळी आहे. भाजपने हवेली तालुक्यात खोलवर पाय रोवले असून, राष्ट्रवादीला तगडे आव्हान देणार, यात तिळमात्र शंका नाही.
तालुक्यातील राष्ट्रवादीची अंतर्गत गटबाजी भाजपच्या पथ्यावर पडणार तर आहेच; परंतु जिल्हा बंकेच्या निवडणुकीत अनेकांना राष्ट्रवादीने बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी दाखविलेले गाजरसुद्धा भाजपला फायदेशीर होणार आहे. असे आश्वासन दिलेल्या सर्वांनाच राष्ट्रवादीला उमेदवारी देता येणार नाही. या नाराजांना भाजपचा पर्याय आहेच.
अजित पवार यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पॅनेल उभा करताना अत्यंत दक्ष राहून फक्त राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीचा पॅनेल तयार होईल, याची काळजी घेतली पाहीजे; अन्यथा जर या निवडणुकीत भाजपचा फायदा झाला, तर याचे परिणाम राज्यभर दिसून येतील व सर्वाधिक तोटा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होईल, असे चित्र सध्यातरी आहे.