गेल्या 3 आठवड्यांपासून सुरू असलेल्या एसटी संपाने राज्य परिवहन महामंडळातील कामगार संघटनांच्या राजकारणाला कलाटणी दिली आहे. या कामगारांच्या एक दोन नव्हे तर तब्बल 28 संघटना असताना कोणताही झेंडा न घेता बेमुदत संपावर गेलेले हे कामगार आपसूक भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली आले आहेत. एकीकडे राज्य सरकारला कात्रीत पकडताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एसटी कामगार संघटना आणि एसटी कामगार सेनेसह या सर्व संघटनांना एकाच वेळी धोबीपछाड दिल्याची चर्चा आहे.
राज्य परिवहन महामंडळात सुमारे 28 संघटना आहेत. त्यापैकी एसटी कामगार संघटना ही 65 हजार सदस्यांसह मान्यताप्राप्त संघटना होय. याशिवाय 17 संघटनांनी एक कृति समिती आहे. या समितीत महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, एसटी कामगार सेना, कास्ट्राईब, मोटर कामगार फेडरेशन आदी संघटना आहेत. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे 6300 सदस्य असून एसटी कामगार सेनेकडेही 43000 सदस्य आहेत. याचा अर्थ कामगार सेना दुसर्या क्रमांकावर आहे. या सर्व संघटनांचे संख्याबळ शून्यात जमा करत भाजपने हा संप आपल्या नेतृत्वाखाली आणला.
भाजपाने आंदोलनाची सूत्रे घाती घेताना इतर संघटनांना पद्धतशीर कामगारांमधून हद्दपार केलेले दिसते. विलिनीकरण अशक्य वाटत असल्याने आधीपासून सर्वच संघटनांनी सावध पवित्रा घेतला होता. संघटनांच्या याच उणीवेचा फायदा घेत भाजपाने एसटी महामंडळात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. कामगारांच्या तोकड्या पगाराचे खापर सर्वपक्षीय संघटनांवर फोडून भाजपाने कामगारांमधील अस्वस्थतेला स्वतःच्या पंखाखाली घेतले आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित मान्यताप्राप्त संघटनेसह शिवसेना प्रणित कामगार सेना आणि काँग्रेस प्रणित इंटकला कामगारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. प्रस्थापित कामगार संघटनांचे प्रतिनिधी कामगारांसमोर येण्यास तयार नाहीत. या सर्वच संघटनांचे सदस्य असलेले कामगार दिशाहीन नेतृत्त्वात संपात उतरले आणि भाजपचे त्यांचे नेतृत्व स्वीकारले, असेच आजचे चित्र आहे.
शेकडो एसटी कर्मचारी आझाद मैदानात ठिय्या देऊन बसले आहेत. संपात फूट नये, याची पूरेपूर खबरदारी भाजपाकडून घेतली जात आहे. सैन्याला ज्याप्रमाणे रसद पुरवली जाते, त्याप्रमाणे आंदोलनाकर्त्या एसटी कर्मचार्यांना विविध सुविधा पोहचवण्याची जबाबदारी भाजपाच्या विविध नेत्यांवर सोपवण्यात आली. महाविकास आघाडी सरकारला कात्रीत पकडण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाची मोठी ताकद या आंदोलनामागे लावली आहे.
सुरुवातीपासून आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्याकडे कामगारांचे नेतृत्त्व सोपवण्यात आले. सातत्याने कामगारांच्या संपर्कात राहण्याची जबाबदारी सोपवताना मैदान न सोडण्याचे आदेश या दोन्ही नेत्यांना देण्यात आले. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि प्रतोद व आमदार प्रसाद लाड यांना कामगारांसाठी लागणार्या सर्व सुविधा पुरवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.
कामगारांचे मनोबल वाढवण्यासाठी सातत्याने प्रविण दरेकरांसह प्रसाद लाड आझाद मैदानात हजेरी लावून सरकारला धारेवर धरत आहेत. त्यांच्या जोडीला आत्तापर्यंत आमदार आशिष शेलार, आमदार नितेश राणे असे आक्रमक समजले जाणारे नेते धाडले जात आहेत. एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनाची धार कमी होऊ नये म्हणून सर्वप्रथम कुणीही उपाशी राहणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.
सुरुवातीला भाजपाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि स्थानिक आमदार राहुल नार्वेकर यांच्याकडून कामगारांच्या जेवणाची व्यवस्था केली गेली. आता ही जबाबदारी आमदार प्रसाद लाड यांच्यासह बेस्ट प्रशासनातील भाजपा प्रणित कामगार संघटनेकडे देण्यात आली आहे.
* आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी राज्यातील प्रत्येक डेपोला टाळे ठोकण्याचे काम भाजप दुसर्या आठवड्यात करणार आहे.
* पुढील आठवड्यात न्यायालयात होणार्या सुनावणीनंतर स्थानिक पातळीवर आंदोलन तापवण्याचे नियोजन भाजपा करत आहे. तोपर्यंत आमदार पडळकर यांना समोर ठेवत प्रविण दरेकर आंदोलनाची कमान सांभाळताना दिसतील.
* त्यानंतर अखेरच्या टप्प्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मैदानात उतरणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
रोजच्या घडामोडींना कामगारांमधून मिळणार्या प्रतिसादाचे मूल्यमापन भाजपा नेते सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत. प्रत्येक गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभरातील एसटी कामगारांपर्यंत पोहचवली जात आहे. त्यामुळे पहिल्या आठवड्यात भरकटलेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनाची सर्व सूत्रे भाजपाच्या हाती गेल्याचे सूत्रांनी सांगितले.