भाजपचा पराभव हे मोदींचे अपयश : खासदार इम्तियाज जलील

भाजपचा पराभव हे मोदींचे अपयश : खासदार इम्तियाज जलील

पुणे : भाजप देशात हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न करत होते. परंतु कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे देशात लोकशाही जिवंत असल्याचे सिद्ध झाले आहे. भाजपचा पराभव हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे अपयश आहे, अशी टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल हा देशाच्या राजकारणाला दिशा देणारा असून, ही एक देशात परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. भाजपला असे वाटत होते, आम्हाला कोणीही पराभूत करू शकणार नाही. लोकांचे अनेक प्रश्न आहेत, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यात बेरोजगारी, महागाई आणि शेतकर्‍यांच्या मुद्यांकडे दुर्लक्ष करून निवडणुकीच्या तोंडावर 'द केरला स्टोरी' हा चित्रपट आणून त्याचा निवडणुकीत फायदा घेण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला. मात्र, त्याचा काही उपयोग झालेला नाही.

मी कर्नाटकमधील मतदारांना धन्यवाद देतो, यातून महाराष्ट्रातील जनताही काही धडा घेईल, अशी अपेक्षाही खासदार जलील यांनी व्यक्त केली. काँग्रेस ही निवडणूक आपण जिंकूच शकत नाही, अशा मनस्थितीतून निवडणूक लढवत होती. परंतु गेल्या काही वर्षांत पहिल्यांदा काँग्रेस कार्यकर्ते निवडणूक जिंकण्याच्या आत्मविश्वासाने निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे त्यांना यश आले आहे.

प्रचारामध्ये काँग्रेसने 40 टक्के कमिशनचा प्रमुख मुद्दा केला होता. त्याचा मोठा परिणाम निवडणुकीच्या निकालात झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातही 15 ते 20 टक्के कमिशन दिल्याशिवाय कामे मिळत नाहीत. हे मी जबाबदारीने सांगत आहेत. मंत्र्यांच्या पीए यांची भेट घेऊन सांगा कमिशन द्यायला तयार आहे, त्यानंतर लगेच पाहिजे तेवढा निधी मिळेल, असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news