पिंपरी शहरातील जैवविविधतेला पोहोचतोय धोका

पिंपरी शहरातील जैवविविधतेला पोहोचतोय धोका

दीपेश सुराणा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचे वाढते नागरीकरण, काँक्रीटीकरणाचा वाढलेला वेग यामुळे वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. पर्यायाने, पशु-पक्षी, जलचरांची अन्नसाखळी तुटत चालली आहे. तसेच, त्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात येत आहे. त्यामुळे पक्ष्यांचे स्थलांतर वाढले आहे. तसेच, शहरातील जैवविविधतेला धोका पोहचत असल्याचे निरीक्षण पर्यावरण अभ्यासक आणि पक्षीमित्रांनी नोंदविले आहे.

नैसर्गिक अधिवासावर परिणाम

शहराची लोकसंख्या सध्या 27 लाखांपेक्षा अधिक आहे. शहरात विविध विकासकामे, गृहप्रकल्पांची उभारणी सुरु आहे. ही कामे करताना शहरातील हरित पट्टा मात्र कमी होत चालला आहे. काही वेळा विकासकामांसाठी तर काही वेळा अनावश्यक कारणासाठी वृक्षतोड केली जात आहे. त्याचप्रमाणे,़ पवना आणि इंद्रायणी नदीपात्रात भराव टाकून पात्र अरुंद केले जात आहे. या सर्व बाबींमुळे पशू, जलचर तसेच पक्षी यांच्या नैसर्गिक अधिवासावर परिणाम होत आहे. जैवविविधता टिकून राहावी, यासाठी झाडे आणि पाणी या दोन बाबी जवळ असणे गरजेचे आहे.

अन्नसाखळी तुटल्याने पक्ष्यांचे स्थलांतर

शहरीकरण आणि काँक्रीटीकरण वाढत असल्याने पक्ष्यांची अन्नसाखळी तुटत आहे. पर्यायाने त्यांचे स्थलांतर वाढले आहे. विविध पक्ष्यांचे शहरातील प्रमाण कमी होत चालले आहे. पाणथळ जागा बुझविल्याने, नदीपात्रात भराव टाकल्याने तेथेही पक्ष्यांच्या अधिवासावर परिणाम होत आहे. पाणथळातील पक्षी कमी होत आहे.

लेसर विशलिंग डग (अडई पक्षी) हा पक्षी चिखलीतील मैलाशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात पाहण्यात येत होता. मात्र, या पक्ष्याचे प्रमाण आता कमी झाले आहे. त्याचप्रमाणे, जांभळा बगळा क्वचितच दिसत आहे. त्याचेही प्रमाण खुप कमी झाले आहे. तसेच, माळराने कमी झाल्याने माळरानात वास्तव्य करणारे चंडोल, डोंबारी, माळटिटवी हे पक्षी देखील कमी प्रमाणात दिसत आहे, अशी माहिती पक्षीमित्र उमेश वाघेला यांनी दिली.

जलचरांचे अस्तित्त्व धोक्यात

शहरातील पवना आणि इंद्रायणी नदीपात्रामध्ये प्रक्रिया न करता काही नाल्यांद्वारे थेट सांडपाणी सोडण्यात येते. त्यामुळे नद्यांना गटारीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे नद्यांतील प्रदूषण वाढले आहे. त्याचप्रमाणे, या नद्यांमध्ये दरवर्षी जलपर्णी पाहण्यास मिळते. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे जलचरांच्या अस्तित्त्वाला धोका निर्माण झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. दोन्ही नद्यांमध्ये मासे मृत होण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत.

चिमण्यांची चिवचिव झाली कमी

पूर्वी घराच्या गॅलरीमध्ये चिमण्या दिसत होत्या. त्याचप्रमाणे, विविध प्रकारच्या रंगीत चिमण्या दिसायच्या. त्यांच्यासाठी पूर्वी शेतांमध्ये ज्वारी आणि बाजरीची धान्ये उपलब्ध होत होती. मात्र, सध्या वाढत्या शहरीकरणामुळे शेती क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे अन्नसाखळी तुटत असल्याने त्यांचे स्थलांतर वाढले आहे. ऩदी किनारी खंड्या पक्ष्याचे दर्शन होत होते. त्याचप्रमाणे, पवना नदीच्या किनारी सकाळी-सकाळी धनेश पक्षी दिसत असे.

भारद्वाज पक्षी देखील दिसत होते. या सर्व पक्षांचे प्रमाण कमी झाले आहे. टिटवी, बुलबूल, कोकिळ आदी पक्ष्यांचे आवाज कमी ऐकण्यास येत आहेत. निगडी-प्राधिकरणातील दुर्गा देवी टेकडीच्या पाठीमागील बाजूला ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान वानरांची टोळी दिसायची. ती देखील सध्या पाहण्यास मिळत नाही. विविध प्रकारच्या लहान आकाराच्या पोपटांची संख्या देखील कमी झाले आहे. श्रृंगी घुबड सध्या दिसतच नाही. जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. गव्हाणी घुबड यांचे वास्तव्य मात्र प्राधिकरणात टिकून आहे, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक विजय पाटील यांनी दिली.

जैवविविधता कशी टिकविता येईल ?

पवना आणि इंद्रायणी या़ नद्यांच्या आजूबाजूचा परिसर व्यवस्थितरित्या विकसित करणे गरजेचे आहे.
भविष्यात नदीपात्राजवळ अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी.
महापालिकेच्या सुधारित विकास आराखड्यामध्ये पुढील दहा वर्षांच्या कालावधीत हरित पट्टा वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक नियोजन करायला हवे.
इमारतींसाठी बांधकाम परवानगी देतानाच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि वृक्ष लागवड या बाबी गांभीर्याने घ्यायला हव्या.
उद्यान विकसित करणे, नदी स्वच्छता, वृक्षारोपण वाढविणे गरजेचे आहे.

जैवविविधता म्हणजे काय?

जैवविविधता मानवी जीवनाचा आधार आहे. पृथ्वीतलावर सजीवांची जी काही विविधता आढळते त्यालाच जैवविविधता असे संबोधले जाते. ही विविधता तीन पातळ्यांवर असते – प्रजाती, परिसंस्था आणि जनुकीय. किडा-मुंगी, वाघ, साप, पक्षी आदी, ही आहे जीवांची विविधता. गवताळ रानं, जंगलं, खारफुटीची जंगलं आदी म्हणजेच परिसंस्थेची विविधता आणि एखाद्या जीवामध्ये/प्रजातीमध्ये ज्या उपजाती असतात त्याला जनुकीय विविधता म्हटले जाते. जसे, आंब्याच्या तोतापुरी, देवगड हापूस, रायवळ अशा उपजाती आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news