पुढारी ऑनलाईन: गुजरात दंगल व बलात्कार प्रकरणातील पीडिता बिलकिस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. यावरील सुनावणीतून खंडपीठाच्या न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे या याचिकेवरील सुनावणीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.
न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर पुनर्विचार याचिकेवर सुनावणी सुरु होती. न्या. रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आदेश दिले की, "आमच्यापैकी एक सदस्याने या खटल्याच्या सुनावणीतून माघार घेतली आहे. न्यायमूर्ती त्रिवेदी यांनी माघार घेण्याचे कोणतेही कारण स्पष्ट केले नसल्याचे रस्तोगी यांनी म्हटले आहे.
गुजरात हिंसाचारादरम्यान बिलकिस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार झाला आणि त्यांच्या कुटुंबियांची हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणातील दोषींची सर्वोच्च न्यायालयाने सुटका केली. यानंतर बिलकिस बानो हिने या निर्णयाला आव्हान देणारी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. 13 मे रोजी देण्यात आलेल्या सुटकेच्या आदेशाचा पुनर्विचार केला जावा, असे बिलकिस यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.