Bihar Ranji Team : मैदानात एकाच संघाच्या दोन टीम!, रणजी सामन्यात नक्की काय घडलं?

Bihar Ranji Team : मैदानात एकाच संघाच्या दोन टीम!, रणजी सामन्यात नक्की काय घडलं?

पुढारी ऑनलाईन डेस्क : रणजी ट्रॉफी 2023-24 चा पहिला दिवस बिहारसाठी निराशाजनक ठरला. स्पर्धेतील बिहारचा पहिला सामना मुंबई विरुद्ध पटना येथील मोईन-उल-हक स्टेडियमवर खेळवण्यात येणार होता. मुंबईविरुद्धचा हा सामना खेळण्यासाठी बिहारचे एक नाही तर दोन संघ मैदानात दाखल झाले होते. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, बिहार क्रिकेट असोसिएशनच्या (बीसीए) दोन गटांमधील वाद मैदानापर्यंत पोहोचले. खेळाच्या सुरुवातीला अधिकाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची आणि किरकोळ हाणामारी झाली. प्रकरण इतके वाढले की, यामध्ये पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. यानंतर  दुपारी बिहार-मुंबई यांच्यातील सामन्याला सुरूवात झाली. (Bihar Ranji Team)

मुंबईविरुद्धचा सामना खेळण्यासाठी मैदानावर पोहोचलेल्या दोन संघांपैकी एक संघ 'बीसीए'चे अध्यक्ष राकेश तिवारी यांनी निवडला होता तर दुसरा संघ निलंबित सचिव अमित कुमार यांचा होता. 'बीसीए'चे अध्यक्ष राकेश तिवारी म्हणाले, 'आम्ही गुणवत्तेच्या आधारावर संघ निवडला असून तो योग्य संघ आहे. बिहारमधून आलेले टॅलेंट तुम्हाला दिसते. आमच्याकडे एक क्रिकेटर (साकिब हुसेन) आहे ज्याची आयपीएलमध्ये निवड झाली आहे. आमच्याकडे १२ वर्षांचा एक प्रतिभावान खेळाडू आहे जो खेळात पदार्पण करत आहे. दुसऱ्याची संघाची निवड निलंबित सचिवाकडून होत असल्याने ती खरी टीम असू शकत नाही.' (Bihar Ranji Team)

दरम्यान, सचिव अमित यांनी तिवारी यांच्या निलंबनाच्या दाव्याला आव्हान दिले. ते म्‍हणाले, "प्रथम: मी निवडणूक जिंकलो आहे. त्यामुळे मी BCA चा अधिकृत सचिव आहे. तुम्ही सचिवाला निलंबित करू शकत नाही. दुअध्यक्ष संघाची निवड कशी करतात? बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना संघाची घोषणा करताना तुम्ही कधी पाहिले आहे का? तुम्हाला नेहमी सचिव जय शहा यांची स्वाक्षरी दिसेल."

'बीसीए'ने एका प्रसिद्धीपत्रकात निलंबित सचिव अमितला बनावट टीमसह येऊन गेटवर अधिकाऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. 'बीसीए ओएसडी मनोज कुमार यांच्यावर बनावट टीममध्ये सामील असलेल्या लोकांनी जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांची ओळख पटली असून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news