बिहारमध्ये महिला उमेदवारांचा बोलबाला

Lok Sabha Election 2024,
Lok Sabha Election 2024,

भारतीय राजकारणात बिहारचे स्थान आगळे-वेगळे आहे. याच भूमीतून विख्यात समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचा नारा दिला होता. आता लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने हे राज्य नव्याने चर्चेत आले आहे ते तेथील महिला उमेदवारांमुळे. यामध्ये लालूप्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांचा उल्लेख करावा लागेल. त्या सिंगापूरमध्ये राहतात. सारण या आपल्या वडिलांच्या परंपरागत मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी त्या बिहारमध्ये आल्या आहेत. काही काळापूर्वी त्यांनी स्वतःची किडनी दान करून आपल्या वडिलांना लालूप्रसाद यांना जीवदान दिले होते, तेव्हापासून त्यांचे नाव चर्चेत येऊ लागले. सध्या त्यांचा प्रचार जोरात सुरू असून बिहारमधील धूळमय वातावरणाचा अनुभव त्या दीर्घ काळानंतर घेत आहेत. त्यांच्यासाठी ही निवडणूक अर्थातच सोपी नाही. कारण, भाजपने राजीव प्रताप रुडी यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्याला सारणमधून मैदानात उतरवले आहे. त्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरणार आहे.

रोहिणी यांच्याप्रमाणेच लालूप्रसाद यांची आणखी एक कन्या डॉ. मिसा भारती यादेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांना राष्ट्रीय जनता दलाने पाटलीपुत्र मतदार संघातून मैदानात उतरविले आहे. खरेतर सध्या त्या राज्यसभेच्या खासदार आहेत. यापूर्वी त्यांनी दोनदा (2014 आणि 2019 मध्ये) पाटलीपुत्रमधूनच लोकसभेची निवडणूक लढविली होती. मात्र, दोन्ही वेळी त्यांना दारुण अपयशाचा सामना करावा लागला होता. यावेळी त्यांची लढत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राम कृपाल यांच्याशी होत आहे. कधी काळी राम कृपाल हे लालूप्रसाद यांचे उजवे हात मानले जात होते, हे विशेष होय. महिला उमेदवारांचा विचार केला तर सिवान मतदारसंघ चर्चेत आला आहे. राजदचे दिवंगत माजी खासदार मोहम्मद शाहबुद्दीन यांची पत्नी हिना शहाब तेथून अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे त्यांचा कितपत निभाव लागेल, हे सांगणे कठीण आहे. त्यांना राजदने तिकीट देऊ केले होते; पण त्यांनी ही ऑफर फेटाळून लावली.

राजदच्या तिकिटावर पूर्णिया मतदार संघातून बीमा भारती मैदानात उतरल्या आहेत. त्यांचा नवरा अवधेश मंडल अट्टल गुन्हेगार असून, त्यामुळे बीमा भारती नेहमी वादग्रस्त ठरत आल्या आहेत. याखेरीज रितू जैस्वाल शिवहर मतदार संघातून भाग्य आजमावत आहेत. त्यांनी सरपंच म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यांची लढत लव्हली आनंद यांच्याशी होणार आहे. लव्हली आनंद यांची पार्श्वभूमीदेखील गुन्हेगारीची आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news