Biggest Sri Krishna Temple : जगातील सर्वात मोठे श्रीकृष्ण मंदिर

Biggest Sri Krishna Temple : जगातील सर्वात मोठे श्रीकृष्ण मंदिर
Published on
Updated on

कोलकाता : 'इस्कॉन' म्हणजेच आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ किंवा हरे कृष्ण संस्थेने जगभर गीता-भागवत तसेच श्रीकृष्णभक्तीचा मोठाच प्रसार केलेला आहे. जगभर या संस्थेची अनेक सुंदर व भव्य मंदिरे पाहायला मिळतात. मात्र, जगातील सर्वात मोठे मंदिरही याच संस्थेकडून भारतात उभे केले जात आहे. पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील मायापूर येथील इस्कॉनच्या मुख्यालयात 2009 पासून या मंदिराचे काम सुरू आहे. 700 एकरांमध्ये (28 लाख चौरस मीटर) पसरलेले हे जगातील सर्वात मोठे मंदिर असेल. आतापर्यंत सर्वात मोठे मंदिर म्हणून कंबोडियातील अंगकोर वाटजवळील ओळखले जायचे, जे 16 लाख चौरस मीटरमध्ये पसरलेले आहे.

मंदिराचा पाया 100 फूट म्हणजे जमिनीत दहा मजली इमारतीच्या बरोबरीने असून यावरून मंदिराच्या आकाराचा अंदाज लावता येतो. येथे वापरल्या जाणार्‍या टाईल्स राजस्थानातील धौलपूर तसेच व्हिएतनाम, फ्रान्स, दक्षिण अमेरिका येथून आणल्या आहेत. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर एकाच वेळी दहा हजार लोकांना भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेता येणार आहे. इस्कॉनचे संस्थापक प्रभुपाद यांनी 1971 मध्ये इथे तीन एकर जमीन खरेदी केली होती. 1972 मध्ये भूमिपूजन झाले आणि 2009 मध्ये बांधकाम सुरू झाले.

सुरुवातीच्या बजेटनुसार मंदिर 600 कोटी रुपयांमध्ये बांधले जाणार होते, परंतु कोरोनामुळे आणि त्यानंतर वाढलेल्या खर्चामुळे बजेट एक हजार कोटींवर पोहोचले आहे. कार निर्माता कंपनी फोर्डचे मालक आल्फ्रेड फोर्ड (अंबरीष दास) यांनी 300 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. हे जगातील सर्वात मोठे वैदिक मंदिरदेखील असेल. या मंदिराची उंची 350 फूट असून भव्य घुमट आहे. मंदिरात युटिलिटी फ्लोअर, टेम्पल फ्लोअर, पुजारी फ्लोअरसमवेत म्युझियम फ्लोअरही आहे. इथे जगातील सर्वात मोठे पुजारी फ्लोअर असून ते अडीच एकरात बनवलेले आहे. येथील कीर्तन हॉल दीड एकरात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news