Navneet Rana : नवनीत राणांच्या उमेदवारीबाबत लवकरच मोठा निर्णय: आमदार रवी राणा

Navneet Rana : नवनीत राणांच्या उमेदवारीबाबत लवकरच मोठा निर्णय: आमदार रवी राणा
अमरावती, पुढारी वृत्तसेवा: अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा  लोकसभा निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे. यासंदर्भात आमदार रवी राणा यांनी शुक्रवारी (दि.१५) एक सूचक वक्तव्य केले आहे.  लवकरच चार-पाच दिवसांत एक मोठा निर्णय यासंदर्भात होईल, असे आमदार रवी राणा म्हणाले. Navneet Rana
विशेष म्हणजे गुरुवारी (दि.१४) रात्री भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आमदार रवी राणा यांची नागपुरात तब्बल अडीच तास चर्चा झाली आहे, अशी माहितीही आमदार राणा यांनी दिली. सकारात्मक चर्चा झाली, पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जो निर्णय घेतला जाईल त्या संदर्भात युवा स्वाभिमान पक्ष सकारात्मक निर्णय घेईल असेही आमदार रवी राणा म्हणाले. Navneet Rana
मागील बारा वर्षापासून आम्ही भाजप सोबत आहोत. युवा स्वाभिमान पक्ष महायुतीचा घटक आहे. खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. त्या निकालाची आम्हालाही प्रतीक्षा आहे अशा आशयाचे विधान देखील आमदार राणा यांनी केले. एकूणच खासदार नवनीत राणा भाजपच्या वाटेवर असल्याचे यावरून स्पष्ट होते आहे. त्यांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल लागताच त्यांचा भाजप प्रवेश होणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Navneet Rana  : 'मी त्यांच्यापुढे जाणार नाही': नवनीत राणा

दरम्यान यासंदर्भात खासदार नवनीत राणा यांनी बोलताना, आपला युवा स्वाभिमान पक्ष आणि आमचे नेते रवी राणा जो काही निर्णय घेतील त्यापुढे मी जाणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहोत आणि पुढेही राहणार आहोत. देशात मोदीजी चांगलं काम करत आहेत आणि आम्ही त्यांच्या विचारावर चालणार आहोत असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news