इंदापूर पोलिसांची मोठी कारवाई : १८ लाखांच्या गुटख्यासहीत २४ लाखाचा माल हस्तगत

इंदापुरात पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोन आरोपींसह जप्त केलेला गुटखा.
इंदापुरात पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोन आरोपींसह जप्त केलेला गुटखा.

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर पोलिसांनी अकलूजकडून पुण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या पिकअप गाडीवर कारवाई करत बंदी असलेला तब्बल १८ लाखांच्या अवैध गुटख्यासह २४ लाखांचा माल हस्तगत केला. याप्रकरणी कर्नाटक राज्यातील प्रकाश कुशान हेगरे (वय २६, रा. कोकटनुर, ता. अथनी, जि. बेळगाव) व मल्लु जयश्री मेलगडे (वय १८, रा. अर्जुनगी, ता. बबलेश्वर, जि. विजापूर) यांना इंदापूर पोलिसांनी अटक केली आहे.

अधिक माहिती अशी की, गुटखा वाहतूक करणारे पिकअप कर्नाटकहून अकलूज – इंदापूरमार्गे पुण्याच्या दिशेने निघाला होता. या वाहनात अवैध गुटखा असल्याची गोपनीय माहिती इंदापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोलपंपाजवळ बुधवारी (दि. २९) रात्री पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईत पिकअप (एमएच १३ डीक्यु २४९६) हा ६ लाख रुपये आणि गुटखा असा एकूण २४ लाख ८ हजार ८०० रुपयांचा माल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस नागनाथ पाटील योगेश लंगुटे, सुनील बालगुडे, विकास राखुंडे यांनी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news