पुढारी ऑनलाईन डेस्क : Bhuvneshwar Kumar Retirement : भारताचा स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमार लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. 33 वर्षीय भुवनेश्वर कुमारने याबाबत एक संकेत दिला आहे. त्याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटच्या बायोमधून 'भारतीय क्रिकेटर' हा शब्द काढून टाकला आहे आणि फक्त 'भारतीय' असा उल्लेख केल्याचे समोर आले आहे.
भुवनेश्वर कुमार अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्याने नोव्हेंबर 2022 मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. यानंतर तो टीम इंडियात पुनरागमन करू शकलेला नाही. दरम्यान, इंस्टाग्राम अकाउंटच्या बायोमधून 'भारतीय क्रिकेटर' हा शब्द हटवल्याने भुवनेश्वरच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे. असे असले तरी त्याच्या ट्विटर अकाउंटवरील नावापुढे 'इंडियन क्रिकेटर' असा उल्लेख आहे. या एका छोट्या बायो अपडेटमुळे यूपीमध्ये जन्मलेल्या खेळाडूच्या निवृत्तीच्या योजनांबद्दल अफवा पसरल्या आहेत. मात्र, यात किती तथ्य आहे, हे येणारा काळच सांगेल. (Bhuvneshwar Kumar Retirement)
भुवनेश्वर कुमार सध्या बंगळूरस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमी म्हणजेच एनसीएमध्ये आहे आणि तो आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर निवृत्तीची घोषणा करू शकतो, अशी चर्चा आहे. भारताचा आयर्लंड दौरा ऑगस्टच्या अखेरीस होणार आहे.
BCCI ने यावर्षी केंद्रीय करारातील खेळाडूंच्या यादीतून भुवनेश्वर कुमारचे नाव वगळले होते. अशातच तो 2023 च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा भाग असण्याची शक्यता नाही. 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून, भुवीने भारतासाठी 87 टी-20, 121 एकदिवसीय आणि 21 कसोटी सामने खेळले आहेत. सर्व फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 294 बळी असून यादरम्यान सातवेळा पाच बळी घेण्याची कामगिरी केली आहे. त्याने नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या 16 व्या हंगामात प्रभावी गोलंदाजी केली होती. या स्पर्धेत त्याने 14 सामन्यात 8.33 च्या इकॉनॉमीने गोलंदाजी करत एकूण 16 बळी घेतले.