‘किंग ऑफ स्विंग’ भुवनेश्वर कुमार याची वन-डे कारकीर्दही संपली?

‘किंग ऑफ स्विंग’ भुवनेश्वर कुमार याची वन-डे कारकीर्दही संपली?

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याची कसोटीनंतर आता वन-डे कारकीर्दही संपल्याचे दिसत आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणार्‍या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेसाठी निवडकर्त्यांनी त्याला संधी दिली नाही. याआधी 2023 मध्ये न्यूझीलंड, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे मालिकांतही त्याला संधी दिली नाही. त्यामुळे एकेकाळी 'किंग ऑफ स्विंग' म्हणून ओळखल्या जाणार्‍या भुवनेश्वरची एकदिवसीय कारकीर्द संपलेली दिसत आहे.

भुवनेश्वर कुमारने टीम इंडियासाठी शेवटचा वन-डे सामना 21 जानेवारी 2022 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. याशिवाय भुवनेश्वर कुमारने टीम इंडियासाठी शेवटचा टी-20 सामना 22 नोव्हेंबर 2022 रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळला. 2018 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या जोहान्सबर्ग कसोटी सामन्यात त्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर 'मॅन ऑफ दि मॅच' ठरला होता; पण त्यानंतर त्याची कसोटी कारकीर्द जवळपास संपुष्टात आली.

कसोटी क्रिकेटमध्ये भुवनेश्वर कुमार टीम इंडियाची सर्वात मोठी ताकद होता. तो चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करून विकेट मिळवायचा आणि गरज पडेल तेव्हा फलंदाजीतून भारतीय संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी चांगली कामगिरी करत होता. भुवनेश्वर कुमारने 2018 मध्ये जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्यात 63 धावा केल्या आणि 4 मोठ्या विकेटस्ही घेतल्या.

मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकट या घातक वेगवान गोलंदाजांनी आता भारताच्या एकदिवसीय आणि कसोटी संघात आपले स्थान निश्चित केले. याशिवाय जसप्रीत बुमराहही अजून यायचा आहे. हे सर्व वेगवान गोलंदाज आजकाल आपल्या झंझावाती कामगिरीने कहर करत आहेत. या गोलंदाजांमुळे भुवनेश्वर कुमारचे भारताच्या वन-डे आणि कसोटी संघात पुनरागमन करणे आता अशक्य आहे.

भुवनेश्वर कुमार बहुतेक सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या पराभवाचे कारण बनला आहे. त्यामुळेच आता निवडकर्त्यांनी या खेळाडूलाही टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

logo
Pudhari News
pudhari.news