अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी दुमजली व्हीआयपी शासकीय विश्रामगृह इमारतीचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमानंतर त्यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकार्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे गुरुवारी रात्री अहमदनगरला आगमन झाले. शुक्रवारी त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ते आढावा बैठक घेणार आहेत. राज्य सरकारच्या विविध योजनांची जिल्ह्यातील अंमलबजावणी तसेच अंमलबजावणीत येणार्या अडचणीबाबत माहिती घेणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर रोडवरील शासकीय विश्रामगृह परिसरात नवीन दुमजली व्हीआयपी शासकीय विश्रामगृह बांधण्यात येत आहे. या इमारतीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून 10 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. या नवीन दुमजली इमारतीमध्ये चार व्हीआयपी कक्ष व चार विशेष व्हीआयपी कक्षांचा समावेश आहे. सकाळी 11 वाजता या दुमजली इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच जिल्ह्याचे खासदार, आमदार व अधिकारी उपस्थित राहाणार आहेत. या कार्यक्रमानंतर सकाळी 11.30 वाजता उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत अहमदनगर येथील कोहिनूर मंगल कार्यालयात भाजप पदाधिकार्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, खासदार डॉ. सुजय विखे, शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे तसेच भाजपचे जिल्हा, तालुका पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित राहाणार आहेत.