Bhima Koregaon case: भीमा कोरेगाव प्रकरणात हनी बाबूंनी जामीन अर्ज घेतला मागे

Bhima Koregaon case
Bhima Koregaon case

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: भीमा कोरेगाव प्रकरणात हनी बाबू यांनी सर्वोच्च न्यायालयातील जामीन अर्ज शुक्रवारी (३ मे) मागे घेतला. भीमा कोरेगाव दंगलीत कथित माओवादी संबंधांवरुन जामीनासाठी हनी बाबू यांनी सर्वोच्च न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती. हनी बाबू आता मुंबई उच्च न्यायालयात नव्याने जामीन याचिका दाखल करणार आहेत. म्हणून सर्वोच्च न्यायालायातील जामीन अर्ज मागे घेत असल्याचे त्यांच्या वकीलांनी सांगितले. (Bhima Koregaon case)

दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांच्यावर भीमा कोरेगावमधील २०१८च्या दंगलीत कथित माओवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप आहेत. त्याप्रकरणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामीन याचीका दाखल केली होती. या जामीन अर्जसंबंधीचे प्रकरण न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि न्यायमूर्ती पंकज मित्तल यांच्या खंडपीठासमोर होते. या प्रकरणातील ६ आरोपींना जामीन मंजूर झाल्याने परिस्थिती बदलली आहे. असे म्हणत जामीन याचिका हनी बाबूंनी शुक्रवारी मागे घेतली. (Bhima Koregaon case)

दरम्यान, हनी बाबू यांना जुलै २०२० मध्ये भीमा कोरेगाव प्रकरणात अटक करण्यात आली होती. सध्या ते नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आहेत. हे प्रकरण ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे आयोजित एल्गार परिषदेतील कथित प्रक्षोभक भाषणांशी संबंधित आहे. ज्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा युद्ध स्मारकाजवळ दुसऱ्या दिवशी हिंसाचार भडकल्याचा दावा पोलिसांनी केला होता. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले होते.

 भीमा कोरेगाव प्रकरणातील ६ जणांना अगोदर जामीन मंजूर

या प्रकरणातील १६ आरोपींपैकी ६ आरोपींना जामीन मिळाला आहे. शोमा सेन यांना गेल्या महिन्यातच जामीन मिळाला. तर त्याअगोदर सुधा भारद्वाज, आनंद तेलतुंबडे, व्हर्नन गोन्साल्विस, अरुण फरेरा आणि वरवरा राव यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर फादर स्टॅन स्वामी याचे जुलै २०२१ मध्ये कोठडीत निधन झाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news