पुढारी ऑनलाईन: भारतातील वाहतूक कायदे आणि नियम अतिशय कडक आहेत, त्यामुळे वाहनधारकांना इतर राज्यांमध्ये वाहन चालवण्यासाठी त्यांच्या वाहनाची पुन्हा नोंदणी करावी लागते. लोकांना होणारा हा त्रास टाळण्यासाठी भारत सरकारने आता बीएच सीरीज नंबर प्लेट आणली आहे, ज्यामुळे आता तुम्ही तुमचे वाहन संपूर्ण भारतभर कोणत्याही त्रासाशिवाय चालवू शकता.
BH सिरीज नंबर प्लेट्स सादर करण्यामागचा उद्देश असा आहे की, अशी नंबर प्लेट असलेल्या मालवाहू वाहनाच्या मालकाला दुसर्या राज्यात जाताना नवीन नोंदणी अर्ज करण्याची गरज नाही. तसेच जे लोक नोकरी करत आहेत आणि त्यांना वारंवार देशाच्या वेगवेगळ्या भागात जावे लागते त्यांच्यासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरेल.
BH सिरीज नंबर प्लेट म्हणजे भारत सिरीज. वाहनांची वाहतूक सुलभ करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 28 ऑगस्ट 2021 रोजी भारत सिरीज क्रमांक प्लेट सादर केली. त्याची नोंदणी 15 सप्टेंबर 2021 पासून सुरू झाली.
बीएच सीरीज नंबर प्लेट अर्जाच्या शुल्काबद्दल सांगायचे झाले तर, 10-20 लाख किंमत असणाऱ्या वाहनासाठी कर दर 10 टक्के आहे. जर वाहनाची किंमत 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर बीएच सीरीज नंबर प्लेट मिळवण्यासाठी वाहनाच्या किंमतीच्या 12 टक्के रक्कम मालकाला भरावी लागेल.
बीएच सीरीज नंबर प्लेटसाठी पात्रता काय?
या सिरीजच्या नंबर प्लेटसाठी केवळ संरक्षण क्षेत्र आणि राज्य सरकार किंवा केंद्र सरकारचे कर्मचारी अर्ज करू शकतात. याशिवाय चारपेक्षा जास्त राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये कंपनीचे कार्यालय असलेले खाजगी क्षेत्रातील कर्मचारी देखील पात्र आहेत.
अर्ज कसा करायचा?
बीएच सीरीज नंबर प्लेट मिळवण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन आहे. वाहन पोर्टलद्वारे खरेदीच्या वेळी डीलरद्वारे वाहनांची ऑनलाइन नोंदणी केली जाऊ शकते. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, वाहन मालकाला त्यांच्या BH सिरीजची नंबर प्लेट मिळेल.