नवी रणनीती प्रभावी ठरेल?

काँग्रेसचे नेते राहुल गांधी
काँग्रेसचे नेते राहुल गांधी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी 'भारत जोडो यात्रा' आरंभली तेव्हापासून त्यांचा राजकीय प्रवास वेगळ्या पद्धतीने सुरू असल्याचे दिसत आहे. शेतकर्‍यांसोबत शेतकरी बनलेले राहुल, ट्रकचालकांसोबत झालेल्या बैठकीत चालकाची भूमिका बजावणारे राहुल आणि हमालांशी संवाद साधताना स्वत: बॅग उचलणारे राहुल, अशी त्यांची विविध रूपेे अलीकडील काळात समोर येत आहेत. आगामी निवडणुकांच्या तयारीचा हा भाग आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी 'भारत जोडो यात्रा' आरंभली तेव्हापासून त्यांचा राजकीय प्रवास वेगळ्या पद्धतीने सुरू असल्याचे दिसत आहे. अलीकडेच राहुल अचानक दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्थानकावर पोहोचले. तेथे त्यांनी हमालांची (कुली) भेट घेतली आणि पाहता पाहता हमालांचे लाल कपडे घालत सामान डोक्यावर घेतले. यानंतर राहुल यांनी त्या सर्व हमालांशी बराच काळ संभाषण केले, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गेल्या काही महिन्यांत शेतकरी बनलेले राहुल, ट्रकचालकांसोबत झालेल्या बैठकीत चालकाची भूमिका बजावणारे राहुल आणि वाहनदुरुस्ती करणार्‍या मेकॅनिकसोबतचे राहुल, अशी त्यांची विविध रूपे अलीकडील काळात समोर येत आहेत. ही शैली, हे राजकारण बरेच काही सांगून जाते. यामागचा हेतू स्पष्टपणे सामान्यांच्या लक्षात येतो. 2014 आणि त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने राहुल यांच्या विरुद्ध प्रतिमाहननाची जोरदार मोहीम उघडली होती.

एकीकडे भाजपची सोशल मीडिया टीम त्यांना पप्पू म्हणून संबोधित होती; तर अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल यांना प्रिन्स असे संबोधले होते. राहुल गांधींना कोणतेही कष्ट न करता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद देण्यात आले आहे, ते एक खानदानी श्रीमंत नेते आहेत, गांधी आडनावामुळेच त्यांना सर्व सोयीसुविधा मिळत आहेत, असा प्रचार सातत्याने भाजपकडून केला जात होता. हे सर्व लेबल्स राहुल यांना बराच काळ चिकटले आणि त्यामुळे काँग्रेसचे वेळोवेळी राजकीय नुकसानही झाले. पण भारत जोडो यात्रेने या सर्व प्रतिमाहननाच्या मोहिमेवर जोरदार हल्ला चढवला. वातानुकूलित खोलीत बसणारा नेता, अशी इमेज तयार केला गेलेल्या राहुल यांनी अंगावरची सर्व झूल बाजूला सारत हजारो किलोमीटर पायी प्रवास केला.

शेतकर्‍यांपासून व्यावसायिकांपर्यंत, तरुणांपासून महिलांपर्यंत, ज्येष्ठांपासून दलित-आदिवासींपर्यंत सर्वांना राहुल भेटले. त्यानंतर पंजाबमध्ये अत्याधुनिक आणि व्हीआयपी वाहनाचा त्याग करत त्यांनी दिल्ली ते अंबाला ट्रकमधून प्रवास केला. त्या प्रवासात स्वत: ट्रक चालवला. बराच वेळ त्या चालकांशी बोलले, त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. या सर्व बाबी अनेकांना प्रसिद्धीचा स्टंट वाटतीलही; परंतु प्रत्यक्ष जनतेत जाऊन मिसळल्यामुळे अनेकदा जातीय समीकरणेदेखील करू शकत नाहीत असे चमत्कार या घटना करू शकतात. राहुल गांधी यांनी ही वाट नियोजनबद्धपणाने स्वीकारली आहे. केवळ रॅली काढून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्याच्या भाजपच्या प्रचारपद्धतीला शह देत राहुल गांधी थेट जमिनीवर जाऊन लोकांना भेटत आहेत.

आजघडीला भाजप राष्ट्रवादापासून हिंदुत्वापर्यंतच्या सर्व राजकीय खेळपट्ट्यांवर जोरदार फलंदाजी करत असताना, काँग्रेसला स्वत:ची राजकीय खेळपट्टी तयार करावीच लागणार आहे. त्याद़ृष्टीने सामान्य माणसांत जाऊन मिसळण्याची खेळपट्टी देशातील सर्वात जुन्या पक्षासाठी योग्य ठरू शकते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news