नाकावाटे कोरोना लस! भारत बायोटेकच्या इंट्रानेझलला DCGI कडून मंजुरी

नाकावाटे कोरोना लस! भारत बायोटेकच्या इंट्रानेझलला DCGI कडून मंजुरी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कोरोना नियंत्रणासाठी विकसित करण्यात आलेल्या व नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयने मंगळवारी मंजुरी दिली. आपत्कालीन स्थितीत सदरची लस वापरण्यास परवानगी देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करत दिली आहे.

देशात विकसित करण्यात आलेली ही पहिली नाकावाटे दिली जाणारी लस आहे. भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीने ही लस विकसित केली आहे. या लसीमुळे कोरोना नियंत्रणाच्या लढ्याला मोठी मजबुती मिळेल, असे मांडविया यांनी सांगितले. देशात आतापर्यंत शंभर कोटींपेक्षा जास्त लोकांना लस देण्यात आलेली आहे. सध्या बूस्टर डोस देण्याची मोहिम विविध राज्यांत सुरु आहे. कोविड- 19 च्या विरोधात भारताने प्रखर लढा दिलेला आहे. नव्याने विकसित करण्यात आलेली लस १८ वर्षांवरील लोकांना दिली जाऊ शकते, असेही मांडविया यांनी स्पष्ट केले.

कोरोनावर भारतात नाकावाटे दिली जाणारी ही पहिली लस असेल. भारत बायोटेकने या लसीबाबत आवश्यक चाचण्या पूर्ण केल्या आहेत. या लसीला आता DCGI कडून हिरवा कंदील मिळाला आहे. मांडविया यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "कोविड-१९ विरुद्धच्या भारताच्या लढ्याला मोठी चालना मिळाली आहे. भारत बायोटेकच्या ChAd36-SARS-CoV-S COVID-19 (Chimpanzee Adenovirus Vectored) या १८ वर्षावरील वयोगटासाठीच्या लसीच्या आपत्कालीन परिस्थितीतील वापरासाठी सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (CDSCO) परवानगी दिली आहे." हे पाऊल साथीच्या रोगाविरुद्ध भारताच्या सामूहिक लढ्याला अधिक बळकट करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

सामान्य लसीपेक्षा नाकाद्वारे दिली जाणारी लस अधिक प्रभावी आहे. कोरोना विषाणूचे नाकावाटे संक्रमण अधिक होते, त्यामुळे भारत बायोटेकच्या या लसीद्वारे प्रथम नाकात अँटीबॉडीज तयार केल्या जातील. यामुळे श्वासोच्छवासाद्वारे फुफ्फुसांपर्यंत विषाणू पोहोचणे कठीण होईल, असा संशोधकांकडून दावा केला जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news