नागपूर ; पुढारी वृत्तसेवा भारतीय लोकशाहीचा उत्सव असलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज (शुक्रवार) पूर्व विदर्भात पाच मतदारसंघात मतदान प्रक्रिया सकाळी 7 वाजता सुरू झाली. सर्वपक्षीय मान्यवरांनी सकाळीच मतदानाचा आपला अधिकार बजावला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी महाल संघ मुख्यालयामागे असलेल्या आदितवार दरवाजा प्राथमिक शाळेत मतदानाचा अधिकार बजावला. नागपूरचे भाजप उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जुन्या गडकरी वाड्याजवळ असलेल्या टाऊन हॅाल, महाल येथे कांचन गडकरी यांच्यासह सहकुटुंब मतदान केले.
इंडिया आघाडी, काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांनी सुभाष नगर कॉर्पोरेशन शाळा येथे मतदान केले. भाजपनेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंजाबचे माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मनपा प्राथमिक शाळा, डिग दवाखानाजवळ, धरमपेठ नागपूर येथे मतदानाचा हक्क बजावला. या शिवाय सर्वात कमी उंचीच्या ज्योती आमगे यांनी भारतीय विद्या निकेतन, जुना बगडगंज येथे मतदान करीत इतरांना मतदानासाठी प्रेरित केले. यासोबतच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामटेक मतदारसंघात कोराडी ग्रामपंचायत परिसरातील मतदान केंद्र क्र. 29, खोली क्र.1, ग्रामपंचायत कार्यालय सभागृह, कोराडी, ता. कामठी येथे मतदान केले.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा, देलनवाडी वॉर्ड, ब्रह्मपुरीला मतदान केले. महायुतीचे रामटेक लोकसभा मतदार संघाचे सेना उमेदवार राजू देवनाथ पारवे यांनी परिवारासह उमरेड, परसोडी येथील पंडीत नेहरू उच्च प्राथमिक शाळेत मतदान केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळाला आहे. जिल्हा प्रशासनाने मतदानाचे ठेवलेले ७५ टक्क्यांचे उद्दिष्ट 'मिशन डिस्टिंक्शन' पार करुन मतदानाचे सर्व विक्रम मोडावे असे आवाहन काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी केले आहे. आपली लोकशाही मजबूत बनविण्यात सहकार्य करावे यावर भर दिला.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव व उत्तर प्रदेशचे प्रभारी अविनाश पांडे यांनी मुंडले कॉलेज खरे टाऊन धरमपेठ मतदान केंद्रावर तर माजी मंत्री काँग्रेसचे नेते डॉ. नितिन राऊत यांनी गुरुनानक स्कूलला मतदान केले. काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांनी महानगर पालिका, शाळा, गांधीनगर येथे मतदानाचा आपला हक्क बजावला.
हेही वाचा :