बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : आधी पसंत आहे म्हणून लग्न केले. घरचे म्हणाले की बायको तुझ्यापेक्षा कितीतरी मोठी आहे, घटस्फोट घे. तेव्हा त्याने बायकोवर घटस्फोटासाठी दबाव आणला. ती ऐकत नाही म्हटल्यानंतर लग्नाआधी केलेल्या प्रणयाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी चक्क पत्नीला दिली. पत्नीने याबाबत पोलिसांत फिर्याद देताच पतीला अटक करून कारागृहात रवानगी केली.
जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यात घडलेल्या या धक्कादायक प्रकरणाची जिल्ह्यात चर्चा आहे. पत्नीने पोलिसांत फिर्याद दिल्याचे माहिती होताच पतीने आधी आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु, आता बरा झाल्यानंतर पोलिसांनी त्याला कारागृहात पाठवले आहे.
खेड्यात शिक्षिका म्हणून गेलेल्या तरुणीवर गावातीलच एका तरुणाचे प्रेम जडले. दोघांची ओळख होऊन ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. यानंतर दोघांनी लग्न केले. लग्नानंतर काही महिन्यांनी सदर तरुणी तरुणापेक्षा दहा वर्षांनी मोठी असल्याचे तरुणाच्या घरच्यांना समजले. त्यामुळे त्यांनी तिला सोडून देण्यासाठी आपल्या मुलावर दबाव आणण्यास सुरवात केली. आधी प्रेमात पडलेला हा तरुणही पलटला आणि तोदेखील तिच्याकडे घटस्फोट मागू लागला. यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले.
व्हिडीओ व्हायरलची धमकी
एकाची इच्छा नसेल तर न्यायालयही सहजरित्या घटस्फोट मंजूर करत नाही. त्यांना वेळ देते. सदर विवाहितेला घटस्फोट द्यायचा नव्हता. परंतु, पतीने तिच्यावर दबाव आणण्यास सुरूवात केली. घटस्फोट दिली नाहीस तर लग्नाआधी केलेल्या प्रणयाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी हा तरुण देऊ लागला. त्यामुळे सदर विवाहितेला धक्काच बसला. तिने असे न करण्याची अनेकदा विनंती केली. परंतु, तो ऐकत नाही म्हटल्यानंतर तिने थेट जिल्हा सीईएन पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली.
आत्महत्येचा प्रयत्न
आपल्याविरोधात पत्नीने तक्रार केल्याचे समजताच तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु, त्याला तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केल्याने तो बचावला. बुधवारी त्याची तब्येत सुधारली. त्यामुळे पोलिसांनी न्यायालयासमोर हजर करून त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी केली. सीईएन पोलिसांकडून तपास सुरू आहे.