पुढारी ऑनलाईन डेस्क : Belarus President Poisoned : बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को (belarus president alexander lukashenko) यांना गंभीर अवस्थेत मॉस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लुकाशेन्को हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भेटण्यासाठी मॉस्कोमध्ये पोहोचले होते पण पुतीन (vladimir putin) यांच्या भेटीनंतर लगेचच त्यांची प्रकृती खालावली, त्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
बेलारूसचे विरोधी पक्षनेते व्हॅलेरी त्सेल्पको यांनी याबाबत माहिती दिली. त्सेल्पको म्हणाले की, 'प्राथमिक माहितीनुसार पुतिन आणि अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्यात मॉस्को येथे बंद खोलीत बैठक झाली. या बैठकीनंतर लुकाशेन्को यांना तात्काळ मॉस्कोमधील सेंट्रल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. उपचारासाठी अनेक विशेषज्ञ उपस्थित आहेत. त्यांचे रक्त बदलले जात आहे.' (Belarus President Poisoned)
व्हॅलेरी त्सेल्पको म्हणाले, 'लुकाशेन्कोची स्थिती अशी नाही की त्यांना इतरत्र हलवता येईल. रशियावर कोणत्याही प्रकारे विषबाधेचे आरोप होऊ नये म्हणून बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांना तत्काळ रुग्णालयात दाखल करून उपचाराचे नाटक केले जात आहे,' असा आरोप त्यांनी केला आहे.
रशियाने युक्रेनवर लादलेल्या युद्धाचे 68 वर्षीय लुकाशेन्को हे समर्थक आहेत. ते पुतिन यांच्या जवळच्या मित्रांपैकी एक समजले जातात. या मैत्रीखातर बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियाला आपल्या देशाची भूमी रशियन सैन्याला युक्रेनवर हल्ला करण्यासाठी वापरण्याची परवानगी दिली. पण असे असूनही पुतीन यांनी विषप्रयोग का केला?, असा सवालही व्हॅलेरी त्सेल्पको यांनी उपस्थित केला आहे. (Belarus President Poisoned)