बीड, पुढारी वृत्तासेवा : दोन वर्षाच्या करोना काळानंतर सध्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकठिकाणी आठवडी बाजार भरत आहेत. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामधील हिरापूर या ठिकाणी दर मंगळवारी पशूचा मोठ्या प्रमाणात आठवडी बाजार भरत असतो. यात गाय, म्हशी शेळी, मेढी व प्रामुख्याने सर्वात मोठा जिल्ह्यातील प्रसिद्ध असा बैल बाजार या ठिकाणी अगदी मोठ्या प्रमाणात बाजार भरत असतो. या ठिकाणी पशुपालक जनावरे खरेदी विक्रीसाठी आणत असतात. परंतु योग्य किंमत मिळत नसल्याने पशुपालकांना आपली जनावरे परत घेऊन जावी लागत असल्याचे चित्र आज बाजारात पाहिला मिळाले.
गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचे संकट होतं. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार, जनावरांचे आठवडी बाजार बंद करण्यात आले होते त्यामुळे जिल्ह्यातील पशुपालकांना जनावरांची खरेदी-विक्री करण्यासाठी वाव मिळाला नाही. मात्र, मागील काही दिवसांपासून हे संकट कमी झाले आहे. यामुळे आठवडी बाजार पेठेत आता गर्दी दिसू लागली आहे तर पशु बाजारात देखील खरेदी विक्रीसाठी आज शेतकरी व व्यापारी वर्गाची गर्दी होती. त्यामुळे शेतकरी पशुपालक हे रब्बी व उन्हाळी हंगामातील पेरणी करून जनावरे विक्रीस येथील बाजारात आणत आहेत. मात्र त्यांना भाव मिळत नाही.
हिरापूर येथील आठवडी बाजारात मंगळवारी मोठ्या प्रमाणात तालुक्यासह जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील ही जनावरे विक्रीसाठी आल्याचे पाहून खरीदार व्यापाऱ्यांनी पशुपालकांची अडवणूक करण्यास सुरुवात केली.
ग्राहक कवडीमोल दराने जनावराची मागणी करत होते. त्यामुळे ज्या पशुपालकांना आपले पशुधन परत घेऊन जाणे शक्य होते, त्यांनी ते परत नेले. मात्र ज्या पशुपालकांना वाहनाचा मोठा भुर्दंड झेपत होता त्यांनी कवडीमोल दराने त्याची विक्री केल्याचे चित्र हिरापूर येथील बाजारात पाहिला मिळाले. मंगळवारी भरलेल्या बाजारात ७०० ते आठशे पशुपालकांनी जनावरे विक्रीसाठी आणली होती. जनावरांना किंमत मिळत नसल्याने पशुपालक कोंडीत सापडले आहेत.
यांत्रिकीकरणाचा परिणाम तालुक्यात ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकर क्षेत्र आहे. ते शेतकरी बैल जोडीचा वापर न करता ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करतात. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची शेती आता बैलावर अवलंबून राहिली नाही. पेरणी, पाळी, नागंरणी, सऱ्या पाडणे ही सर्व कामे ट्रॅक्टरच्या साह्याने होत असल्याने पशुधनाची मागणी मात्र घटली आहे.
-विष्णू येवले
हिरापूरचा बाजार सध्यातरी शेतकऱ्यांसाठी स्वस्त आहे. सध्या शेतीचे काम आवरले असल्याने बैल योग्य दरात मिळत आहेत. पावसाच्या तोंडावर बैल महाग होतात म्हणून शेतकरी सध्या बैल खरेदी करीत आहेत. म्हणून सध्या बाजारामध्ये गर्दी पाहायला मिळते. बाजारामध्ये पोपटराव गोरे या शेतकऱ्याकडे चांगल्या दर्जाची बैल पाहायला मिळाली.
हे ही वाचलं का