रायगड : दिवाळीची सुट्टी शाळांना लागली आणि सार्या राज्य आणि परराज्यांतील पर्यटकांची पावले निसर्ग रमणीय कोकणातील समुद्र किनार्यांकडे वळली आहेत. कोकणातील अगदी पालघरपासून ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यांच्या सागरी किनारपट्टीत पर्यटकांनी तुडुंब गर्दी केली आहे.
ऐन दिवाळीच्या दिवसात कोकणच्या सागरी किनारपट्टीतील सुमारे 30 हजार लहान मोठ्या कॉटेज, रिसॉर्ट, हॉलिडे होम्स, घरगुती निवारे यामध्ये दररोज सरासरी 8 ते 10 लाख पर्यटक मुक्कामी आले होते. सकाळी येऊन संध्याकाळी परतणार्या पर्यटकांची संख्या दररोज सरासरी चार ते सहा लाखांच्या घरात होती. यातील सर्वाधिक पर्यटक हे रायगड जिल्ह्यात होते आणि सद्यस्थितीत आहेत, अशी माहिती निसर्ग पर्यटन संस्थेचे प्रमुख आणि कोकणातील पर्यटन व्यवसायाचे अभ्यासक संजय नाईक यांनी दिली आहे.
कोकणातील निसर्ग हा पर्यटकांना आकर्षित करणारा तर आहेच; मात्र त्याच बरोबर त्या पर्यटनस्थळी आणि किनारी भागात पोहोचण्याकरिता सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा या गेल्या 20 वर्षांत मोठ्या प्रमाणात विकसित झाल्या आहेत. त्यातील सर्वात उल्लेखनीय प्रवासी सुविधा म्हणजे मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया आणि भाऊचा धक्का येथून अलिबाग तालुक्यातील मांडवा आणि रेवस दरम्यानची सागरी जलमार्ग सेवा आहे. गेटवे येथून मांडवा जेट्टी येथे येणारी अत्याधुनिक कॅटमरान आणि अन्य बोटी, भाऊचा धक्का येथून आपल्या चारचाकी वाहनांसह पर्यटकांना घेऊन येणारी रो-रो बोट सेवा, रेवस येथे पोहोचणारी बोट सेवा ही पर्यटकांच्या आकर्षणाची केंद्रबिंदूच झाली आहे. याशिवाय गेल्या 22 वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील सागरी मार्ग अभ्यासक डॉ. चंद्रकांत मोकल यांनी कोकणातील खाड्यांमध्ये जंगलजेट्टीची संकल्पना अंमलात आणून पर्यटकांना आपल्या वाहनांसह ये-जा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. सद्यस्थितीत जयगड, बाणकोट, आगरदांडा-दिघी आणि दाभोळ या खाड्यांमध्ये ही जंगलजेट्टी सुविधा उपलब्ध करून दिली असून, कोकणातील जिल्हे खाडीतील जलमार्गांनी जोडून पर्यटन व्यवसायात आमूलाग्र बदल घडवून आणला असून, त्यातून पर्यटन व्यवसाय विक्रमी प्रमाणात वाढला आहे. सागरी मार्गावरील हा जलप्रवास खर्च खूप कमी असून, वाहनांचे डिझेल मोठ्या प्रमाणात वाचते. त्याच बरोबर हवेचे प्रदूषण त्यामुळे कमी होत असल्याने पर्यटकांना हाच प्रवासाचा पर्याय भावला असून, त्यामुळेच पर्यटकांची संख्या कोकणात वाढली आहे.
केळशी, वेळास किनार्यावरील कासव महोत्सव, रायगडमधील दिवेआगर, हरिहरेश्वर, रत्नागिरीतील आंजर्ले, हेदवी, गुहागर, मुरूड, हर्णे, दाभोळ, जयगड, नांदिवडे, दाभोळ, कर्दे, मुरूड, लाडघर, कोळथर, भंडारपुळे, सिंधुदुर्गातील देवगड, वेंगुर्ला, जयगड, कुणकेश्वर, तारकर्ली, साखरीनाटे, पावस, पूर्णगड, वेत्ये, गावखडी या सगळ्या ठिकाणी 20 वर्षांपूर्वी फारसे पर्यटक येत नसत; कारण त्यावेळी फिरायला जाणं ही संकल्पना नव्हती. नातेवाइकांकडे मे महिन्यांत जाणं, असं स्वरूप तेव्हा होते. याला अपवाद फक्त गणपतीपुळे आणि मालवण, तारकर्लीचा होता. याला मुख्य कारण म्हणजे या तीनही ठिकाणी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची कॉटेज उपलब्ध होती.