पुढारी ऑनलाईन डेस्क : India tour of West Indies : टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभव पत्करावा लागला. विजेतेपदाचा सामना संपल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले.
भारतीय संघ जुलै आणि ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर असेल. या कालावधीत भारत दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. 6 स्टेडियममध्ये 10 सामने आयोजित केले जातील. अमेरिकेत दोन सामने होणार आहेत. हा दौरा 12 जुलैपासून सुरू होणार आहे.
बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर वेळापत्रक जाहीर केले. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिली कसोटी 12 ते 16 जुलै दरम्यान डॉमिनिका येथील विंडसर पार्क येथे तर दुसरी कसोटी 20 ते 24 जुलै दरम्यान त्रिनिदाद येथील क्वीन्स पार्क ओव्हल येथे होणार आहे. हा दोन्ही संघांमधील 100 वा कसोटी सामना असेल. 27 जुलैपासून वनडे मालिकेला सुरुवात होईल. सुरुवातीचे दोन्ही सामने बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे खेळवले जाणार आहेत. दुसरा सामना 29 जुलै रोजी होणार आहे. या मालिकेतील शेवटचा आणि तिसरा सामना क्वीन्स पार्क ओव्हल येथे 1 ऑगस्टला आहे. (India tour of West Indies)
3 ऑगस्टपासून दोन्ही संघ टी-20 मालिकेत भिडतील. यातील पहिला सामना त्रिनिदाद येथील ब्रायन लारा अकादमीमध्ये होणार आहे. दुसरा सामना 6 आणि तिसरा सामना 8 ऑगस्ट रोजी होणार आहे. हे दोन्ही सामने गयाना येथील नॅशनल स्टेडियमवर होणार आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज संघ अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात शेवटचे दोन टी-20 सामने खेळणार आहेत. चौथा सामना 12 ऑगस्टला आणि पाचवा सामना 14 ऑगस्टला फ्लोरिडा येथील ब्रॉवर्ड काउंटी स्टेडियमवर खेळवले जाणार आहे. (India tour of West Indies)
भारतीय संघ गेल्या वर्षी जुलैमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी उभय संघांमध्ये तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. त्यात भारताने वनडे मालिका 3-0 तर टी-20 मालिका 4-1 ने जिंकली होती.