बार्शी ‘फटे स्कॅम’ प्रकरण : फटेच्या घोटाळ्याची व्याप्‍ती शेकडो कोटींवर

बार्शी ‘फटे स्कॅम’ प्रकरण : फटेच्या घोटाळ्याची व्याप्‍ती शेकडो कोटींवर

सोलापूर/बार्शी ; पुढारी वृत्तसेवा : बार्शीतील 'फटे स्कॅम' प्रकरणात मुख्य आरोपी विशाल फटे याच्या वडिलांना आणि भावाला पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपी विशाल फटे याच्या शोधासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) तयार करण्यात आले असून सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या 8 तपास पथकांमार्फत त्याचा शोध सुरू आहे. कोल्हापूर येथील विशेष पोलिस महानिरीक्षकांकडीलही एक पथक बार्शीमध्ये तपासासाठी आल्याचे समजते. तसेच रेडकॉर्नर नोटीससाठी केंद्र सरकारलाही पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

अंबादास गणपती फटेे (वय 63) आणि वैभव अंबादास फटे (28, दोघे रा. घर नं. 822/ब, कर्मवीर हौसिंग सोसायटी, अलिपूर रोड, बार्शी, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या दोघांना बार्शीतील न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश भस्मे यांनी त्यांना 20 जानेवारीपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली.

अंबादास फटे हे कन्सलटंट सर्व्हिसेस कंपनीचे संचालक आहेत. या दोघांना सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी मध्यरात्री सांगोला येथून ताब्यात घेतले. कोट्यवधीच्या फसवणूकप्रकरणी विशाल फटेसोबत परिवारातील 4 सदस्य देखील आरोपी आहेत. त्यापैकी दोघाजणांना आता ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी विशाल फटे अद्यापही फरार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी , शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून अल्पावधीत मोठा मोबदला देण्याचे आमिष विशाल फटे याने दाखविले. त्यासाठी त्याने कंपनीही स्थापन केली होती. सुरुवातीला विशाल फटे याने काहीजणांना मोठा मोबदलाही दिला. यातून त्याचे गुंतवणुकीचे जाळे पसरत गेले. परिणामी लाखांच्या गुंतवणुकीची व्याप्ती कोट्यवधीत पोहोचली. ही व्याप्ती केवळ बार्शी तालुक्यापुरती न राहता राज्य आणि परराज्यांतही पसरल्याचे समजते.

दरम्यान, गेल्या 15 दिवसांपासून गुंतवणुकीच्या रकमा गोळा करून विशाल फटे फरार झाल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे गुंतवणूकदारांनी त्याच्या कार्यालय व घरी धाव घेत गुंतवणुकीच्या रकमा परतीसाठी तगादा लावला होता. पण विशाल फटेचे वडील अंबादास फटे, भाऊ वैभव फटे यांनी हात वर केले होते. त्यामुळे विशाल फटेसह पाचजणांवर गुन्हे दाखल करून पोलिसांनी अंबादास फटे, वैभर फटे यांना अटक केली.

विशेष तपास पथकामार्फत तपास

याबाबत गुन्हा दाखल होताना 6 तक्रारदारांची जवळपास 5 कोटी 63 लाखांची फसवणूक झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र शनिवारपर्यंत तक्रारदार वाढल्याने हा आकडा जवळपास 12 कोटींवर पोहोचल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच गुन्ह्याची व्याप्ती पाहता तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

सुरुवातीला तपास पोलिस निरीक्षकांकडे होता मात्र आता हा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक संजयकुमार बोठे हे करीत आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची निर्मिती केली असून यामध्ये बार्शी उपविभागीय पोलिस अधिकारी, बार्शी शहर पोलिस ठाण्याचे दोन अधिकारी, आर्थिक गुन्हे शाखेचे दोन अधिकारी अशा पाचजणांची नेमणूक करण्यात आली हे पथक उपअधीक्षक बोठे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करणार आहे.

आठ पथकांमार्फत विशालचा शोध

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी विशाल फटे हे 9 जानेवारी रोजी विशाल पत्नी राधिका व मुलगी इंद्रायणीसह पसार झाला आहे. त्याच्या शोधासाठी सोलापूर ग्रामीण दलाची 8 तपास पथके रवाना झाली आहे. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेची 4, आर्थिक गुन्हे शाखा आणि बार्शी शहर पोलिस ठाण्याच्या प्रत्येकी दोन पथकांचा समावेश आहे.
विशालचे कार्यालय, घर सील, बँकेतील अकाऊंटही गोठवले

विशाल फटे विरुद्ध गुन्हा नोंद होताच पोलिसांनी उपळाई रोडवर असलेल्या त्याच्या कार्यालयाची आणि बार्शीतील घराची झडती घेतली. झडतीमध्ये पोलिसांनी विविध कागदपत्रे, चेकबुक जप्त केल्याची माहिती आहे. सोबतच विशालचे कार्यालय आणि घर देखील पोलिसांनी आता सील आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी विविध बँकेतील त्याची खाती पत्र देऊन गोठवण्यात आली आहे.

रेड कॉर्नर नोटीससाठी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार

कोट्यवधी रुपयांच्या या स्कॅमचा मुख्य आरोपी विशाल फाटे हा त्याची पत्नी व मुलीसह पसार झाला आहे. तो देश सोडून जाऊ शकतो, अशी शक्यता गृहीत सोलापूर ग्रामीण पोलिसांनी त्याच्याविरुध्द रेड कॉर्नर नोटीस काढण्यासाठी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच पुणे येथील विभागीय पासपोर्ट कार्यालयालाही त्याचा पासपोर्ट सील करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे.

'फटे स्कॅम'ची व्याप्‍ती कर्नाटकात देखील

बार्शीतील विशाल फटे याने केलेल्या 'स्कॅम'ची व्याप्‍ती ही बार्शीपुरतीच मर्यादित नाही. त्याच्याकडे सोलापूर जिल्ह्यात अनेकांनी गुंतवणूक केली आहे. बार्शीतील सामान्य नागरिकांबरोबरच मोठे उद्योजक, सरकारी कर्मचारी, अधिकारी तसेच राजकारणी व्यक्‍तींनीदेखील फटे याच्याकडे गुंतवणूक केली असल्याचे समजते. कर्नाटकातील काही व्यक्‍तींनीदेखील फटे याच्याकडे गुंतवणूक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे फटे स्कॅमची व्याप्‍ती ही कर्नाटकापर्यंत वाढून फसवणुकीचा आकडा हा कित्येक कोटीमध्ये जाण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

फटेच्या घोटाळ्याची व्याप्‍ती शेकडो कोटींवर

बार्शी ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या चर्चेत असलेल्या बार्शीतील विशाल फटे शेअर बाजार फसवणूक प्रकरणाची व्याप्‍ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. चर्चेनुसार हा आकडा शेकडो कोंटींवर असल्याची चर्चा आहे. मात्र, सध्या शनिवारी सायंकाळपर्यंत झालेल्या तक्रारीनुसार 11.50 कोटींचा गुन्हा दाखल झाला आहे. अद्यापही तक्रारींचा ओघ सुरूच आहे.

सामान्य कुटुंबातील विशाल फटे याने शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावे कंपनी काढली. त्यामध्ये पत्नी राधिका, वडील अंबादास, भाऊ वैभव व अलका फटे (सर्व रा. अलीपूर रोड, माऊली चौक, बार्शी) संचालक आहेत. त्या आधारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या मोबदल्यात महिन्याला 5 टक्के व्याज देण्याच्या आमिषाने अनेकांना जाळ्यात ओढले. सुरुवातीला लोकांना त्याने मोबदलाही दिला. त्याआधारे विश्‍वास निर्माण झाल्याने शहरासह तालुका आणि जिल्हाभर त्याचे गुंतवणुकीचे नेटवर्क वाढले. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र, कर्नाटकातही त्याने एजंट, सहकार्‍यांच्या मार्फत जाळे विणल्याचे समजते.

या आधारे लाखांतून कोटी आणि पुढे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाल्याने त्या आधारे त्याने मोठी माया गोळा केली. अनेकवेळा परदेश वार्‍याही केल्या. सोबतच अनेक पुरस्कारही मिळवून त्याने राजकारण, समाजकारणासह विविध खात्यातील अधिकार्‍यांनाही आपल्या गुंतवणुकीच्या मोहजाळात ओढले. त्याचे मार्केटिंग करीत त्याने आपले चांगलेच बस्तान बसविले होते.

पण पुढे मोठी माया गोळा झाल्यानंतर गुंतवणुकीचा झोल अधिक वाढत गेला आणि त्यातून प्रकरण अंगलट आल्याची चर्चा आहे. हा प्रकार लक्षात येताच त्याने माया गोळा करून दुबईला पळ काढल्याचे समजते. इकडे तो फरार झाल्याची आणि फसवणुकीबाबत वारे पसरताच गुंतवणूकदार हवालदिल झाले. त्यांनी तत्काळ त्याच्या कार्यालय, घरासह संचालकांकडे तगादा सुरू केला. पण फटे फरार आणि इतरांनी हात वर केल्याने पोलिसांच्या दरबारात हे प्रकरण केले. यातून फटे याचा जवळचाच मित्र असलेल्या फिर्यादी दिपक अंबारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फटे याच्यावर शहर पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला होता.

प्रारंभी पुढे आलेल्या तक्रारदारांच्या तक्रारी अर्जावरून गुंतवणूकदारांची 5 कोटी 63 लाखांची फसवणूक केल्याबद्दल प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर शुक्रवारी रात्री 8 वाजेपर्यंत गुंतवणूकदारांकडूृन झालेल्या तक्रारीवरून फसवणुकीचा आकडा वाढत जाऊन 11 कोटी 50 लाख झाला होता.

त्यानंतर शनिवारी सायंकाळपर्यंत पोलीस ठाण्यात येणारा तक्रारींचा ओघ सुरूच होता. तब्बल एक हजार कोटीच्या पुढे हा फसवणुकीचा प्रकार असु शकतो असे बोलले जाऊ लागले आहे. शहरातील अनेेक मातब्बर व नामांकित लोकांना फटे याने आपल्या जाळ्यात ओढलेले असल्याची चर्चा होत आहे.कांही प्रतिष्ठित गुंतवणूकदार तर आपण उजेडात येऊन तक्रार द्यावी का गप्प रहावे, यावरच विचार करत असल्याचे समजते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news