नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : ओडिशातील बालासोर येथे 2 जून रोजी झालेल्या भीषण रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी रेल्वेच्या तीन अधिकार्यांना अटक केली आहे. अरुण कुमार महंत (सीनिअर सेक्शन इंजिनिअर), मोहम्मद अमीर खान (सेक्शन इंजिनिअर) आणि पप्पू कुमार (टेक्निशियन) अशी त्यांची नावे आहेत. या तिघांवरही सदोष मनुष्यवध आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे.
या तिघांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आपल्या निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना घडू शकते हे तिन्ही आरोपींना माहीत होते, असा दावाही सूत्रांनी केला आहे. अपघाताची चौकशी करणार्या रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी गेल्या आठवड्यात या अपघातासाठी सिग्नलिंग विभागातील कर्मचार्यांच्या मानवी चुकांना जबाबदार ठरवले होते. बालासोर अपघातात 293 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, 1,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
बालासोर दुर्घटनेच्या चौकशी अहवालात सिग्नल आणि दूरसंचार विभागातील अनेक स्तरावरील त्रुटी या अपघातास कारणीभूत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सिग्नल सर्किट डायग्राममध्ये बिघाड झाला नसता, तर 293 प्रवाशांना जीव गमवावा लागला नसता. भविष्यात यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी 14 बाबतीत दक्षता घेण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.