बहार विशेष : आचंद्रसूर्य नांदो…

बहार विशेष : आचंद्रसूर्य नांदो…
Published on
Updated on

'चांद्रयान-3' मोहिमेच्या यशाबद्दल जगभरातून कौतुक होत आहे. दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. येत्या काही वर्षांत अनेक चांद्रमोहिमा आखल्या जाणार असून, त्या सर्व दक्षिण धु्रवावरच होणार आहेत. यावरून 'चांद्रयान-3' मोहिमेचे महत्त्व लक्षात येते. आता देश सूर्यमिशन 'आदित्य एल-1'च्या यशस्वी प्रक्षेपणाची वाट पाहत आहे.

भारताचे 'चांद्रयान-3' चंद्राच्या दक्षिण धु्रवावर यशस्वीरीत्या अलगदपणे उतरले आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) नव्या ऐतिहासिक पर्वाला सुरुवात झाली. या अभूतपूर्व यशाने शास्त्रज्ञांचे मनोबल उंचावले गेले आहे. आता भारतच नाही, तर संपूर्ण जगभरातील संशोधकांचे चंद्रावर चौदा दिवस मुक्काम करणार्‍या चांद्रयानाच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे. 'चांद्रयान-3'कडून मिळणार्‍या मौल्यवान माहितीकडे डोळे लागलेले आहेत. एकप्रकारे असेही म्हणू की, यशस्वी सॉफ्ट लँडिंग हा फक्त ट्रेलर आहे, खरा पिक्चर अद्याप बाकी आहे. आशा-आकांक्षांसह तसेच महत्त्वाकांक्षेसह चंद्राचा दक्षिण धु्रवाचा पृष्ठभाग जाणून घेण्याबाबत संपूर्ण जगाला उत्सुकता लागलेली आहे. एकुणातच चंद्रावर सूर्याचा उदय झाला आहे, असे म्हटल्यास गैर ठरणार नाही.

प्रत्येक नव्या प्रयत्नांसह विज्ञान आपल्याला कसे शिकवत जाते आणि पुढे नेत जाते, हे चांद्रयानाच्या यशातून समजू शकते. चांद्रयानाच्या पहिल्या मोहिमेत वापरण्यात आलेली निम्मी उपकरणे स्वदेशी बनावटीची होती आणि उर्वरित अमेरिका, बल्गेरिया आणि युरोपातून सामूहिक भागीदारीतून आणण्यात आलेली होती. 'चांद्रयान-2'मध्येदेखील सर्व उपकरणे भारतीय बनावटीची होती. 'चांद्रयान-3'मध्येही सर्व उपकरणे मेक इन इंडियाच आहेत. अर्थात, यात अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने विनंती केल्याने एक उपकरण बसविण्यात आले होते. या अभियानात जगातील सर्व अभियानांमध्ये आलेल्या अनुभवाचा संचय आहे आणि त्यांचे काहीना काही योगदान राहिले आहे, हेही वास्तव आहे.

2007 ते 2010 या काळात भारताव्यतिरिक्त चीन, जपान, अमेरिका आणि युरोपीय देशांनी अनेक चांद्रमोहिमा आखल्या. अर्थात, प्रत्येक अभियानातून मिळालेल्या शास्त्रीय आकडेवारीतूनच नव्या अभियानाची मुहूर्तमेढ रोवली जाते. आता प्रश्न असा की, 'चांद्रयान-3'मधून आपल्या हाती काय लागणार? प्रत्यक्षात चांद्रयानाचे उपकरण येत्या 14 दिवसांत शेकडो छायाचित्रे आणि आकडेवारी पृथ्वीवर पाठवणार आहे. यानुसार चंद्रावरचे द्रवपदार्थ, हवामान, घटक आदी गोष्टींची माहिती मिळू शकेल. तसेच त्यांचे प्रमाण, आकारमान, रचना आदींचाही शोध घेतला जाणार आहे. याशिवाय या अभियानाच्या माध्यमातून पृथ्वी, सूर्य आणि आकाशगंगेतील अनेक अज्ञात तारे, ग्रहांची माहिती नव्या रूपातून मिळवू शकू. इथे काही घटकांची माहिती आणि आकडेवारी मिळू शकते आणि यानुसार प्लेटेनरी डिफेन्स (खगोलशास्त्रीय संरक्षण) चा आराखडा तयार करण्यास मदत मिळेल. अशाप्रकारची मौलिक माहिती संपूर्ण जगासाठी गरजेची आहे.

भारताच्या या मोहिमेचे सर्वात मोठे यश म्हणजे दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. 'चांद्रयान-1'च्या यशाचे आकलन केल्यास 'नासा'च्या 'एम-क्यूब'ने (मून मिनरॉलाजी मॅपर) चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे शोधून काढले. चंद्रावर पाण्याचे सर्वाधिक प्रमाण आणि शक्यता ही दक्षिण धु्रवावर राहू शकते. आता हे पाणी कोणत्या रूपात आहे, कसे असू शकते, हे जाणून घेणे बाकी आहे. आणखी एक बाब म्हणजे, येत्या काही वर्षांत अनेक चांद्रमोहिमा आखल्या जाणार असून, त्या सर्व दक्षिण धु्रवावरच होणार आहेत. यावरून 'चांद्रयान-3' मोहिमेचे महत्त्व लक्षात येते. यातही काही मोहिमा निवडक देशांच्या आहेत, तर काही मोहिमा खासगी कंपन्यांमार्फत आखल्या जाणार आहेत.

'चांद्रयान-3'च्या मदतीने चंद्रावरच्या घटक पदार्थांची माहिती मिळणार आहे. उदाहरणार्थ, चंद्रावर सोडियम असल्याचे ठाऊक होते; परंतु ते किती प्रमाणात आहे, हे कळत नव्हते. चांद्रयानात असलेल्या एक्स-रे स्पेक्ट्रोमीटरच्या डेटा संकलनातून त्याचे आकलन होणार आहे. आतापर्यंतचा सर्वाधिक सक्षम एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर 'चांद्रयान-3'मध्ये बसविण्यात आला असून, तो 25 किलोमीटर क्षेत्रातील घटक पदार्थांचा डेटा गोळा करेल. या चाचणीतून चंद्रावर उपस्थित घटक पदार्थांचा अचूक शोध लागेल. अशाच प्रकारे भूकंपमापक डेटातून चंद्रावरील चंद्रकंपांची स्थिती कळू शकेल. एवढेच नाही, तर पृथ्वीप्रमाणेच चंद्राच्या पोटात कोर (लहरी केंद्र) आहे की नाही? हेदेखील समजेल. अंतरिक्ष जीवनाचा शोध घेण्याच्या द़ृष्टीने 'चांद्रयान-3'ची विशेेष भूमिका राहणार आहे.

यातील आर्बिटिंग प्लॅटफॉर्मवर विशेष उपकरण बसविण्यात आले असून, ते चंद्रावर पृथ्वीवरच्या जीवनमानाच्या निकषाची नोंद करेल. आकाशगंगेतील अन्य तारे, ग्रहांचा अभ्यास करून निश्चित पॅरामीटरच्या आधारे त्यांचे आकलन करण्यात येईल. यानुसार, एखाद्या ग्रहाकडून निश्चित केलेल्या पॅरामीटरशी मिळत्याजुळत्या गोष्टी हाती लागण्याची शक्यता आहे. तसे घडले तर अवकाशात पृथ्वीव्यतिरिक्त अन्य ठिकाणी ऑक्सिजन, जीवन आहे, हे जाणून घेण्याच्या द़ृष्टीने सुरू असलेल्या अभ्यासांना आणि संशोधनांना एक महत्त्वाचा आयाम प्राप्त होईल. अशाप्रकारची अनेक महत्त्वपूर्ण माहिती गोळा करणे, हे भारताला मोठी अंतरिक्ष शक्ती म्हणून पुढे आणण्यास मदत करणार आहे. या क्षेत्रात आपल्या पुढे असणारे देश आपल्याशी ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न या मोहिमेच्या यशानंतर वाढणार आहे. त्यातून माहितीची देवाण-घेवाण वाढणार आहे. परिणामी, चंद्रासंबंधीच्या आणि अंतराळविश्वासंबंधीच्या संशोधनाची व्याप्ती आणखी वाढेल.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा यान प्रक्षेपणाचा अनुभव, त्याची यशस्विता आणि आता 'चांद्रयान-3'बाबत घेतलेली खबरदारी पाहता, जगातील अनेक देश यान आणि उपग्रह सोडण्यासाठी भविष्यकाळात 'इस्रो'ची मदत घेऊ शकतील. त्याचा व्यावहारिक वापरदेखील करता येईल. कोणत्याही क्षेत्रातील मोठे यश हे व्यक्ती, संस्था, संघटना, कंपनी अथवा देशाला जगात नवीन ओळख निर्माण करण्यास मदत करणारे असते. अंतराळ क्षेत्रातील यश हे देश-विदेशात शिकणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांनादेखील मोलाचे ठरू शकते. या मोहिमेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला अनेक नव्याने सहकारी लाभतील.

भविष्यात चंद्रावर जीवन शक्य आहे का? असा जर प्रश्न विचारला तर भू-शास्त्रीय भाषेत उत्तर द्यायचे झाल्यास का नाही? असे म्हणावे लागेल. विज्ञान हे कोणत्याच गोष्टीला नाकारत नाही. मात्र, प्रश्न असा की, त्याला बरेच कंगोरे आहेत. चंद्रावर पृथ्वीपेक्षा काही वेगळे जीवन आहे का? तेथे जीवनाची शक्यता सोडली, तर पृथ्वीवरचे जीवन हे चंद्राशिवाय शक्य आहे का? नाही. चंद्र नसेल तर पृथ्वीवर जीवन असण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण, हा चंद्र पृथ्वीची गती आणि स्थितीला वेग देण्यास मदत करतो. समुद्रातील अनेक जीवजंतूच्या जीवनाचा अभ्यास केल्यानंतर अशाप्रकारचे तथ्य समोर आले आहे. भरती आणि ओहोटी हे याबाबतचे एक महत्त्वाचे उदाहरण आहे. मानवी व्यवहारांवरदेखील चंद्राच्या गतीचा आणि स्थितीचा परिणाम होतो.

संपूर्ण जगासाठी महत्त्वाचे ठरलेल्या 'चांद्रयान-3' मोहिमेत अभियांत्रिकीचे सुमारे 300 विद्यार्थी आणि संशोधनातील 30 शास्त्रज्ञांचा समावेश आहे. स्पेस रिसर्च पॉलिसीनुसार, एका ठराविक काळानंतर या अंतराळ मोहिमेतून मिळणारा डेटा हा माझ्यासह अनेकांसाठी मोलाचा असून, त्याचा अभ्यास करायचा आहे. विशेष म्हणजे, यातून मिळणारी दुर्मीळ माहिती मानवतेच्या कल्याणासाठी उपयुक्त ठरणार आहे. यापूर्वीच्या दोन्ही चांद्रयान मोहिमांच्या डेटा विश्लेषणाचे काम मी केले आहे. लहानपणी जेव्हा 'आधा है चंद्रमा, रात आधी…'सारखे गीत ऐकायचो, तेव्हा चंद्रावरून, त्याच्या अस्तित्वावरून माझ्या बालमनात कुतूहल वाटायचे. आज माझ्यासाठी चंद्र वेगळा आहे आणि खास आहे. अनेक रहस्यमय गोष्टींनी युक्त असलेला हा छोटासा आणि प्रेमळ तुकडा पृथ्वीपासून वेगळा होत काही अंतरावर टिकून आहे. उद्याच्या भविष्यात या बालकथांमधील चंद्राविषयीच्या अनेक रहस्यांचा उलगडा होत जाऊन त्या समृद्ध होतील.
(लेखक आयआयटी कानपूर येथे अर्थ सायन्स विभागात सहायक प्राध्यापक आहेत.)

वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षमतेची साक्ष

चंद्रावर 'विक्रम' लँडरचे यशस्वी लँडिंग हे भारताच्या अनेक दशकांपासून निर्माण झालेल्या वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षमतेची साक्ष आहे. या यशामुळे भारताने वेगाने बदलणार्‍या जागतिक स्पेस क्लबमध्ये आघाडी मिळवली आहे. चार वर्षांपूर्वी 'चांद्रयान-2'मध्ये झालेल्या त्रुटीनंतर शास्त्रज्ञांनी लँडरच्या 'पॉवर डिसेंट'च्या महत्त्वाच्या टप्प्यात अनेक नवीन वैशिष्ट्यांचा समावेश केला. संभाव्य धोके शोधण्यासाठी एक नाही, तर दोन कॅमेरे, लँडिंगसाठी एक आदर्श साईट शोधण्यासाठी सुधारित अल्गोरिदम (नियंत्रण, नेव्हिगेशन आणि मार्गदर्शनासाठी) बनवली. या बदलामध्ये केंद्रीकृत इंजिनचाही समावेश करण्यात आला होता. या सर्व गोष्टींमुळे 'इस्रो'च्या शास्त्रज्ञांना सर्व काही अपयशी ठरले तरी 'विक्रम' उतरेल, असा दावा करण्याचा आत्मविश्वास दिला. आज हा आत्मविश्वास खरा ठरला आहे.

संशोधनाचा नवा अध्याय

अत्यंत गुंतागुंतीच्या मोहिमेचे लक्ष्य असलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. जगातील महासत्ता असलेल्या रशियाच्या 'लुना-25' मिशनच्या क्रॅशने हे मिशन किती गुंतागुंतीचे आहे, हे दाखवून दिले. 'चांद्रयान-2'च्या कटू आठवणीतून धडा घेत भारताने यशाचा नवा अध्याय लिहिला आहे. तेही एखादा हॉलीवूडपट बनवता येईल इतक्या कमी खर्चामध्ये! यामुळेच जगभरात भारताच्या यशाची चर्चा आहे. अमेरिकन स्पेस एजन्सी 'नासा' आणि युरोपियन स्पेस एजन्सीने चांद्रयानाच्या यशाबद्दल 'इस्रो'चे अभिनंदन केले आहे. अशा ऐतिहासिक घटनांमुळे राष्ट्राच्या जीवनात नवचैतन्य निर्माण होण्यास मदत होते. हे क्षण कोणत्याही राष्ट्राच्या जीवनात अविस्मरणीय असतात. रशिया, चीन आणि इस्रायलच्या मोहिमा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाण्याच्या प्रयत्नात अयशस्वी ठरल्या, हे यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवे. या यशाच्या निमित्ताने आपण देशाचे महान शास्त्रज्ञ होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांची दूरदृष्टी लक्षात ठेवायला हवी, ज्यांच्या प्रयत्नाने आपण जगात विज्ञान आणि संशोधनाचा नवा अध्याय लिहू शकलो आहोत. धोरणकर्त्यांचे प्रोत्साहन आणि शास्त्रज्ञांच्या प्रतिभा आणि अथक परिश्रमांमुळे हे नक्कीच शक्य झाले आहे. भारताची 'चांद्रयान-3' मोहीम मानवतावादी विचाराने पुढे गेली आहे. आता देश सूर्यमिशन 'आदित्य एल-1'च्या यशस्वी प्रक्षेपणाची वाट पाहत आहे. पृथ्वीपासून सुमारे पंधरा लाख किलोमीटर अंतरावर असणार्‍या सूर्याचे रहस्य शोधण्याचा प्रयत्न ही मोहीम करेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news