अपघात : दुर्लक्षाचा जीवघेणा परिपाक

ओडिशा रेल्वे अपघात
ओडिशा रेल्वे अपघात

ओडिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघाताची हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी दृश्ये आठवडाभर अवघा देश पाहत होता. रेल्वे सुरक्षा केवळ संगणक, सॉफ्टवेअर किंवा यंत्राशी संबंधित नाही, तर गँगमन, फिटर, ट्रेन परीक्षक यांच्याशीही संबंधित आहे. यापैकी एकही दुवा कमकुवत झाल्यास किती मोठी किंमत मोजावी लागू शकते, हे ओडिशातील अपघाताने दाखवून दिले आहे.

अलीकडेच ट्विटरवर 15-20 सेकंदांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. एका मोठ्या हॉलमध्ये अनेक मृतदेह एका रांगेत ठेवलेले आहेत. झोळी पकडलेली एक वृद्ध व्यक्ती खाली वाकून त्यातील एकेक मृतदेहांकडे पाहते आणि थोड्या वेळाने बाजूला येते. व्हिडीओ बनवणारा विचारतो, तुम्ही कोणाला शोधत आहात? तो घसा खाखरत म्हणतो, "मुलगा सापडत नाहीये. सगळीकडे बघितलं." त्याच्या उदास डोळ्यांत अश्रू असतात. घरी गेल्यावर मुलाच्या आईला काय सांगायचं की, त्याचा मुलगा कोणी पळवून नेला, या विचाराने तो उद्ध्वस्त झालेला असतो. आपला मुलगा वर्ल्ड क्लास रेल्वेस्टेशन बनवणार्‍या आणि बुलेट ट्रेन आणण्यात गुंतलेल्या रेल्वेने नेला की, अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा बिघडलेल्या रेल्वेने? की, ग्राऊंड स्टाफची कमतरता असणार्‍या रेल्वेने? की, चालकांनी 12 तासांंपेक्षा जास्त ड्युटी करणे अपरिहार्य असणार्‍या रेल्वेने? की, ती रेल्वे जिच्या रुळांची देखभाल का होत नाहीये? काय सांगायचं घरी?

या प्रश्नांनी ग्रासलेले असंख्य चेहरे ओडिशातील रेल्वे अपघातानंतर दिसून येत होते. ओडिशाचा रेल्वे अपघात हा भारतातील सर्वात मोठा अपघात आहे. यामध्ये तीन रेल्वेगाड्यांची टक्कर झाली. यात सुमारे 300 जणांचा मृत्यू झाला असून, हजारो लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी किती जणांना आपले हात-पाय गमवावे लागले असतील? कोण जाणे!

चेन्नईला जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस आणि बंगळूरहून येणारी यशवंतपूर एक्स्प्रेस या नेहमीच खचाखच भरलेल्या असतात. दक्षिणेकडील राज्यांत कामासाठी जाणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणावर असते. आपल्या व्यवस्थेच्या लेखी अशा गरीब, मजूर आणि कारागिरांच्या आयुष्याचे मोल असते, ना मृत्यूनंतर त्यांच्या शवांची पर्वा असते. त्यामुळेच या अपघातानंतर छोट्या-मोठ्या ट्रकमध्ये अक्षरशः कचर्‍यासारखे हे मृतदेह उचलून टाकून देण्यात आले. कदाचित आपली लोकसंख्या खरोखरच खूप मोठी आहे, म्हणूनच माणसाच्या जीवन-मरणाला इथे काडीचीही किंमत नसते.

आता राहिला प्रश्न भारतीय रेल्वेचा. भारताने कृषिप्रधान राष्ट्र बनावे की उद्योगप्रधान? या प्रश्नाच्या उत्तराच्या ऊहापोहासारखी स्थिती भारतीय रेल्वेची आहे. रेल्वेतील मूलभूत गरजांची पूर्तता करायची, पाया भक्कम करायचा की, गतिमानता वाढवणे, सुशोभीकरण करणे, आलिशानता वाढवणे यावर भर द्यायचा याबाबतचे उत्तर रेल्वेच्या धुरिणांना अद्यापपर्यंत सापडलेले नाही. या अनिर्णीत अवस्थेमुळे दोन्हीही बाजूंची पूर्तता करण्यामध्ये रेल्वेला यश आलेले नाही.

जागतिक दर्जाची स्थानके, बुलेट ट्रेन प्रकल्प, वंदे भारत ट्रेन्स, लक्झरी टुरिस्ट ट्रेन्स या सर्वांमध्ये जनरल डबे असणार्‍या साध्या एक्स्प्रेस गाड्यांची संख्या वाढवण्याचे नावच घेतले जात नाहीये. उलट सर्वच ट्रेन्समध्ये जनरलचे डबे कमी करून वातानुकूलित बोगींची संख्या वाढवण्यात येत आहे. परिणामी, जनरल डब्यांमध्ये भुसा भरल्यासारखी गर्दी होत आहे. स्लीपर कोच आता जनरलच्या डब्यांसारखे झाले आहेत; तर थ्री टायर एसीचे डबे स्लीपरसारखे झाले आहेत.

रेल्वेगाड्यांचा सरासरी वेग वाढल्याने अपघातही वाढत आहेत. एका अहवालानुसार, 2022-23 मध्ये जीवितहानी करणारे 48 रेल्वे अपघात घडले आहेत. वर्षभरापूर्वी त्यांची संख्या 35 होती. 2022-23 मध्ये जीवितहानी न झालेल्या रेल्वे अपघातांची संख्या 162 होती. यामध्ये सिग्नल पास डेंजर (एसपीडी-ड्रायव्हरने लाल सिग्नलकडे दुर्लक्ष करणे) च्या 35 घटनांचा समावेश आहे.

संसदेच्या स्थायी समितीने रेल्वेबाबत 2016 मध्येच दिलेल्या आपल्या अहवालात म्हटले होते की, अर्ध्याहून अधिक अपघात रेल्वे कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे होतात. अशा चुकांमध्ये कामातील निष्काळजीपणा, देखभालीतील अनास्था, शॉर्टकट अवलंबणे, विहित सुरक्षा नियम आणि प्रक्रियांचे पालन न करणे यांचा समावेश होतो.

याखेरीज या अहवालानुसार, अनेक अपघात सिग्नल यंत्रणेतील त्रुटींमुळेदेखील होतात. त्यासाठी लोको पायलट जबाबदार आहेत. वाढत्या रेल्वे वाहतुकीमुळे लोको पायलटला प्रत्येक किलोमीटरवर एक सिग्नल मिळतो आणि त्यांना सतत हाय अलर्टवर राहावे लागते. शिवाय, सध्या लोको पायलटसाठी कोणतेही तांत्रिक साहाय्य उपलब्ध नाहीये. रेल्वेमध्ये कर्मचार्‍यांची कमतरता आहे. त्यामुळे लोको पायलटना त्यांच्या ड्युटीच्या निर्धारित तासांपेक्षा जास्त वेळ काम करावे लागते. परंतु, कामाचा अतिरिक्त ताण आणि थकवा यामुळे हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात घातला जातोय आणि ट्रेनच्या सुरक्षेवर याचे गंभीर परिणाम होत आहेत. रेल्वे बोर्डाकडून अलीकडेच लोको पायलटना त्यांच्या विहित कामाच्या तासांपेक्षा जास्त वेळ काम करावे लागत असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.

आणखी एक मोठी समस्या म्हणजे, रेल्वे रुळावरून घसरणे. 'परफॉर्मन्स ऑडिट ऑन डिरेलमेंट इन इंडियन रेल्वे' नावाचा हा अहवाल डिसेंबर 2022 मध्ये संसदेत मांडण्यात आला होता. रेल्वे रुळावरून घसरण्यास जबाबदार असलेला प्रमुख घटक ट्रॅकच्या देखभालीशी संबंधित होता. 'कॅग'च्या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, ट्रॅक नूतनीकरणाच्या कामांसाठी निधीचे वाटप गेल्या काही वर्षांत घटले आहे. तसेच या निधीचा पूर्ण वापरही केला गेलेला नाही. या अहवालात असे दिसून आले आहे की, 217 परिणामकारक रेल्वे अपघातांपैकी 163 अपघात हे रेल्वे रुळावरून घसरल्याने झाले. एकूण परिणामकारक किंवा गंभीर अपघातांपैकी हे प्रमाण 75 टक्के इतके आहे. याखेरीज रेल्वेला आग लागणे (20), मानवरहित लेव्हल क्रॉसिंगवरील अपघात (13), रेल्वेंची टक्कर (11), मानवयुक्त लेव्हल क्रॉसिंगवरील अपघात (8) आणि विविध (2) असे अपघात गेल्या काही वर्षांत घडले आहेत. या अहवालात म्हटल्यानुसार, भारतीय रेल्वे बोर्ड रेल्वे अपघातांचे दोन श्रेणींमध्ये वर्गीकरण करते. एक म्हणजे, परिणामकारक रेल्वे अपघात आणि दुसरी श्रेणी म्हणजे इतर रेल्वे अपघात.

परिणामकारक रेल्वे दुर्घटनांमध्ये मानवी जीवितहानी होणे, लोक जखमी होणे, रेल्वेसंपत्तीची हानी होणे, रेल्वेच्या वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होणे या तीन घटकांचा समावेश आहे. याखेरीज घडणारे इतर सर्व अपघात 'इतर रेल्वे अपघात' या श्रेणीत गणले जातात. 'कॅग'च्या अहवालात असे म्हटले आहे की, इतर रेल्वे अपघातांच्या श्रेणीत 1,800 अपघात झाले असून, यापैकी 68 टक्के म्हणजेच 1,229 अपघात हे रेल्वेगाडी रुळावरून घसरल्यामुळे झाले आहेत. या अहवालाचा एकूण फोकस रेल्वे रुळावरून घसरल्यामुळे झालेल्या अपघातांवरच आहे.

रेल्वेच्या स्थायी समितीने डिसेंबर 2019 मध्ये रेल्वे मंत्रालयाला सल्लावजा इशारा दिला होता. त्यानुसार रेल्वेतील कर्मचार्‍यांच्या कमतरतेचा तपासणीच्या दिनक्रमावर नकारात्मक परिणाम होत आहे. रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या द़ृष्टीने ही बाब अत्यंत धोकादायक आहे, असे म्हटले होते. फेब्रुवारी 2023 पर्यंत रेल्वेमध्ये किमान 3,12,039 अराजपत्रित पदे रिक्त होती. रेल्वेच्या सर्व झोनमध्ये उत्तर विभागात सर्वाधिक 39,059 जागा रिक्त आहेत. गेल्या काही वर्षांपासून रिक्त पदांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

जून 2022 पर्यंत एकूण 2,95,684 अराजपत्रित पदे रिक्त होती. डिसेंबर 2021 मध्ये ही संख्या 2.86 लाख होती, असे आकडेवारीवरून दिसून येते. रिक्त पदांमध्ये रेल्वे रुळांचे दररोज निरीक्षण आणि देखभाल करणारे कर्मचारीदेखील समाविष्ट आहेत. रेल्वे सुरक्षा केवळ संगणक, सॉफ्टवेअर किंवा यंत्राशी संबंधित नाही, तर गँगमन, फिटर, ट्रेन परीक्षक इत्यादी सर्व जण या वाहतूक व्यवस्थेचा कणा आहेत. त्यामुळे यापैकी एकही दुवा कमकुवत झाल्यास किंवा त्याने ढिसाळपणा दाखवल्यास त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. अपघात केव्हाही आणि कुठेही होऊ शकतो. त्यामुळे रेल्वे व्यवस्थेतील प्रत्येक घटकाचे लक्ष फक्त आणि फक्त अपघात होणार नाही आणि कोणाचाही जीव जाणार नाही, यावरच असले पाहिजे. जागतिक दर्जाच्या स्थानकांसाठी आणि चकाकणार्‍या आलिशान ट्रेन्ससाठी आणखी वाट पाहण्याची आमची तयारी आहे. सद्यस्थितीत आम्हाला सुरक्षितपणे पोहोचण्याची हमी हवी आहे. त्यासाठी गतिमानतेपेक्षा सुरक्षेवर अधिक भर देणे गरजेचा आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील भरारीचा यासाठी निश्चितपणाने उपयोग केला जाऊ शकतो.

योगेश मिश्र,
ज्येष्ठ पत्रकार-विश्लेषक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news