साहित्‍य : हिरव्या बोलीचा शब्द

साहित्‍य : हिरव्या बोलीचा शब्द

अजिंठा डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या पळसखेड या दोन हजार लोकवस्तीच्या चिमुकल्या गावात शेती करत करत 'हिरव्या बोलीचा' शब्द झालेले ना. धों. महानोर यांची कविता अक्षरवाङ्मयात समाविष्ट होण्याइतकी मोलाची आहे. ही कविता आपोआपच उमलून येते, कधी दुःखाने उन्मळूनही जाते. तिची लय ती स्वतः घेऊन येते. मातीतल्या चैतन्यानं भारून जाणारा हा अनोखा कवी होता.

1960 च्या दशकात 'नवे कवी नव्या कविता' अशा शीर्षकाखाली एका नामवंत प्रकाशन संस्थेनं काव्यसंग्रहांची मालिका प्रकाशित करायला आरंभ केला. 1967 मध्ये ही मालिका त्यावेळच्या एका नव्या दमदार कवीचा काव्यसंग्रह घेऊन आली. कवी होते नामदेव धोंडी महानोर आणि काव्यसंग्रहाचं नाव होतं 'रानातल्या कविता!'

ह्या शेताने लळा लाविला असा की
सुखदुःखाला परस्परांशी हसलो – रडलो
आता तर हा जीवच अवघा असा
जखडला
मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द
जाहलो…

ही महानोरांची पहिली कविता. 'प्रतिष्ठान' या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या चार कवितांपैकी ही एक. नंतर अनेक प्रतिष्ठित वाङ्मयीन नियतकालिकांत महानोरांच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. पूर्वसूरींच्या कवितांपेक्षा अगदी भिन्न प्रकृतीची आणि प्रवृत्तीची असलेली कविता कवितेची जाण आणि विशेष आवड असणार्‍या वाचकांना स्तिमित करणारी होती. अजिंठा डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या पळसखेड या दोन हजार लोकवस्तीच्या चिमुकल्या गावात शेती करत करत 'हिरव्या बोलीचा' शब्द झालेला नामदेव हा अस्सल कवी तत्कालीन कवितेच्या प्रवाहात इतका वेगळा ठरला की, त्याची कविता अक्षरवाङ्मयात समाविष्ट होण्याइतकी मोलाची ठरली.

मराठी काव्य परंपरेत निसर्गकविता काही नवीन नव्हती. ना. धों. महानोरांच्या आधी केशवसुतांनी मराठीत आणलेल्या सौंदर्यवादी काव्यप्रवाहात स्वतः केशवसुतांनी जरी सशक्त अशी निसर्गकविता लिहिली नसली, तरी बालकवींनी उत्तम निसर्गकविता आणली. नंतरच्या काळात बा. भ. बोरकर, मंगेश पाडगावकर इत्यादी कवींनीही निसर्गकविता लिहिल्या. तथापि, महानोरांची कविता ही पूर्वसूरींच्या कवितांपेक्षा अत्यंत वेगळी उठून दिसणारी ठरली; पण यापैकी बहुतेक सर्व कवींच्या कविता या निसर्गावर मानवी भावभावनांचे आरोपन करणार्‍या होत्या, तर महानोरांची कविता ही तथाकथित सौंदर्यवादाच्या पल्याड जाऊन निसर्गाचीच बोली बोलणारी ठरली. महानोरांच्या कवितेवर वर्ड्स्वर्थ, शेली आदी पाश्चिमात्य कवींचा पगडा आणि प्रभाव नाही. ती स्वतःची कविता आहे.

प्रतिमांची निर्मिती करून त्या जंजाळात गुरफटून जाणारी महानोरांची कविता नाही. तसेच, रूपवादी साहित्यापासूनही ती वेगळी आहे. छंदोबद्ध (किंवा लयबद्ध) कविताही पूर्वी लिहिल्या गेल्या. महानोरांचे समकालीन म्हटले जातील असे कवी ग्रेस यांचीही कविता लयबद्ध आहे; पण ती दुर्बोधतेनं झाकोळलेली आहे. बा. सी. मर्ढेकर यांच्यानंतर मराठी कवितेनं एक दुबोर्र्ध वळण घेतलेलं दिसते; पण लयबद्ध कवितेच्या संदर्भात ग्रेस यांचं नाव अधोरेखित करावं लागतं.

कावळे उडाले स्वामी
तुम्ही भगवे अंथरले ना?

ग्रेस यांच्या या दोनच ओळी खर्‍या; पण भावनेला आणि बुद्धीलाही त्यातल्या प्रतिमा उलगडत नाहीत. हे उदाहरण देण्याचं कारण असं की, महानोर यांच्या कवितेत प्रतिमा नावाची गोष्ट अस्तित्वात नाही. प्रतिमांचं ओझं झुगारून त्यांची कविता-

विस्तीर्ण नदीचा काठ, पसरली दाट
फुलांची नक्षी
गर्दीत हरवली वाट, कुणी सैराट
बावरा पक्षी
पाण्यात
एक साउली
हले बाहुली
थरकते ऊन
ही माल्हन म्हणते गान चंद्र माळून
बहकते रान

अशी थेटच काळजाला भिडते. ती एक मनोहर चित्रच डोळ्यांसमोर उभी करते. महानोरांच्या कवितेला शीर्षक नसते. त्यामुळं एक शीर्षक मनात पकडून कविता समजून घेण्याची वाट थांबते; असं असलं तरी या कवितेला शीर्षकाचं बंधनच नाही, म्हणजेच ती सलगपणे रसिकाच्या मनात उतरत राहते, उलगडत राहते. अशी चित्रदर्शी कविता हे महानोरांच्या कवितेचं एक वैशिष्ट्य आहे.

प्रश्न आहे छंदोबद्धतेचा. सुरेश भट यांच्या 'रंग माझा वेगळा' या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत पु. ल. देशपांडे म्हणतात, 'गुलाबाच्या फुलाला चित्रकलेचा डिप्लोमा घ्यावा लागत नाही.' गुलाबाच्या फुलालाच काय; पण कुठल्याही फुलाला उमलताना, फुलताना चित्रकलेची पदवी – पदविका घ्यावी लागत नाही. तशी, महानोरांची कविता मराठी विषय घेऊन एम.ए. होऊन, माधवराव पटवर्धन यांच्या 'छंदोरचना' ग्रंथाचा अभ्यास करून त्यात दिलेल्या अक्षरगण आणि मात्रावृत्तात बसवून लिहिलेली कविता नाही. हे म्हणजे फुलाने उमलण्यापूर्वी चित्रकलेची पदवी घेण्यातला प्रकार झाला. महानोरांच्या कवितेला अक्षरगण वृत्त असो की, मात्रा वृत्त असो, त्यात स्वतःला बसवून घेऊन व्यक्त होण्याचा करकचता बंध सोसवणाराच नाही. त्यांची कविता आपोआपच उमलून येते, कधी दुःखाने उन्मळूनही जाते. तिची लय ती स्वतः घेऊन येते. म्हणूनच-

पक्ष्यांचे लक्ष थवे
गगनाला पंख नवे
वार्‍यावर
गंधभार
भरलेले ओचे,
झाडांतुन
लदबदले
बहर कांचनाचे
घन वाजत गाजत ये, थेंब अमृताचे

याप्रमाणे ती गगनाचे पंख होणार्‍या पक्ष्यांप्रमाणे मुक्त विहार करते… अशी त्यांची प्रसन्न शब्दकळा कवितेत सहजपणे उमलून येते. त्यांच्या कवितेच्या अंतरंगातच सुरांचा झरा आहे; तो असा खळाळून प्रवाहित होतो. महानोरांच्या अनेक कविता लतादीदींनी गायिल्या. त्या गाण्यात त्यांना कोणतीही ओढाताण करावी लागलेली नाही, जर त्यांच्यापुढे आव्हान असलेच, तर ते हृदयाथांच्या अनवट चालींचेच; पण मूळ कवितेतच शब्द हे सूर घेऊन येत असल्यामुळे कवितेचं 'गाणं' अधिकच सुंदर होऊन येतं. लतादीदींच्या सुरांवर अतिशय प्रेम असल्यामुळंच जातिवंत शेतकरी असलेल्या महानोरांनी आपण विकसित केलेल्या सीताफळाच्या वाणाला 'लताफळ' असं नाव दिलं. लतांच्या स्वरांइतकंच मधुर असलेलं फळ! लताफळ!!

ना. धों. महानोर यांना आपलं महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं; पण त्यांच्या रसरशीत लेखनाला कुठल्याही कागदी प्रमाणपत्रांची काय आवश्यकता होती? त्यांचं लेखन त्यांच्या शेतातच पिकत होतं. त्यांच्याबरोबरच बहरत होतं.

आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा! महानोरांच्या आधी कवितेत निसर्ग होता; पण शेती नव्हती. आनंद यादव यांच्यासारखा तुरळक अपवाद वगळता तत्कालीन मराठी कवितेत निसर्ग असला, तरी शेतीचं 'पीक' उगवत नव्हतं. कवितेत 'शेती' आली, ती महानोरांच्या लेखणीतून!

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे

या कवितेच्या उल्लेखाशिवाय महानोरांच्या कवितेचा विचार पूर्णच होऊ शकत नाही, इतकी ही कविता महत्त्वाची आहे. प्रेमिकेच्या केसांतून काढून घेऊन त्याला जोंधळ्याच्या धाटाला लगडायला लावणार्‍या महानोरांच्या प्रतिभेचं कौतुक आहे ते यासाठीच. मातीतल्या चैतन्यानं भारून जाणारा हा अनोखा कवी होता. 'रुजे दाणा दाणा, ज्येष्ठाचा महिना, मातीतला गंध ओला, चौखूर दिशांना पाखरांचे पंख, आम्हां आभाळ पुरेना' अशी मातीतली अस्सल कविता लिहिणारा हा शेतकरी कवी म्हणूनच मराठी कवितेच्या समृद्ध परंपरेत वेगळा उठून दिसतो.

त्यांची प्रेमकविताही शारीर प्रीतीची थेट मांडणी करते. तिला प्रतिमांचा सोस नाही. तिच्यात चोरट्या इशार्‍यावरचा खेळ नाही आणि उगीचच आत्म्याने आत्म्यावर प्रेम (प्लेटॉनिक लव्ह) करण्याच्या बाता नाहीत. प्रणयाच्या खुल्या रंगाची मुक्त उधळणही आहे.

सये किनी गऽ
तुला कसे सांगू शब्दात.
साऽजण दिवसा अडून बसला
(मीहि भरात)
देहावरती चळ भरलेले अवखळ हात.

त्यांच्या अशा कवितेलाच काही ठिकाणी दुःखाची झालर येते. '- सरलं दळण ओवी अडली जात्यात; उभ्या जन्माचा उमाळा कळ सोसून डोळ्यांत' असे दुःखाचे कढही त्यांच्या कवितेत अनेक ठिकाणी येतात.

महानोरांची कविता ही बिनचेहर्‍याची नाही; तिला स्वतःचा चेहरा आहे. शेताने लावलेला लळा हा त्यांच्या उभ्या जगण्याचा आधार होता. म्हणून त्यांच्या कवितेत शेतकर्‍याच्या सुख- दुःखांना शब्द प्राप्त होतो; पण केवळ निसर्गकविता आणि शेताचं सौंदर्य मांडणारी कविता हे महानोरांचं एवढंच वैशिष्ट्य नाही. त्यांनी इतरही जी पुस्तकं लिहिली, त्यांचीही नोंद घ्यावीच लागेल. पाणी ही समस्त जीवसृष्टीची मूलभूत गरज आहे. अर्थात, ती शेतकर्‍याचीही महत्त्वाची गरज आहे, हे ओळखून त्यांनी 'शेतीसाठी पाणी' हे पुस्तक लिहिलं. 'प्रार्थना दयाघना' या संग्रहातून शेतकर्‍याच्या होरपळलेल्या मनाचं दर्शन घडतं. 'अजिंठा' हे काव्य, 'गांधारी' ही वेगळ्या धाटणीची आणि मांडणीची कादंबरी, 'जगाला प्रेम अर्पावे' हे एक अत्यंत वेगळं काव्य! सानेगुरुजींच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा वेध घेणारं हे काव्य आहे. सानेगुरुजींच्या 'जगाला प्रेम अर्पावे' या स्वभावाबरोबरच अन्यायाशी लढणारे कणखर गुरुजी महानोरांनी चितारलेले आहेत. त्यांच्या कवितेतले एक लक्षणीय वळण म्हणजे 'तिची कहाणी' हे दीर्घकाव्य! अशा अनेक वैशिष्ट्यांनी ना. धों. महानोर यांची कविता विनटलेली आहे. मराठी काव्य परंपरेतील एक महत्त्वाचा आपली अनमोल अशी काव्यसंपदा ठेवून नुकताच इहलोक सोडून गेला. त्यांची अजरामर आणि रसरशीत कविता हेच त्यांचं चिरंतन अस्तित्व आहे!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news