क्रेडिट झालं उदंड

क्रेडिट झालं उदंड
क्रेडिट झालं उदंड

भारतात क्रेडिट कार्डधारकांकडे असणार्‍या थकबाकीचा आकडा 2 लाख कोटींच्या पुढे गेला आहे. 'आज खर्च करा आणि 45 दिवसांनी पैसे द्या,' या आकर्षक संकल्पनेला भुलताना आपल्या आर्थिक क्षमता, परिस्थिती आणि कर्जाची परतफेड न केल्यास आकारले जाणारे भरमसाट व्याज याचा विचार न केल्याचे गंभीर परिणाम दिसू शकतात.

'ऋ ण काढून सण साजरे करू नयेत,' अशी म्हण आहे. त्यासाठी बालवयापासून आपल्याकडे 'अंथरूण पाहून पाय पसरावेत,' असे संस्कार घरोघरी केले जातात. मिळणार्‍या उत्पन्नातून महिन्याचा खर्च भागवताना थोडीशी काटकसर करून भविष्यातील अडीनडीसाठी, एखादी मोठी वस्तू घेण्यासाठी, मुलाबाळांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी चार पैसे बाजूला ठेवून बचत करणार्‍या घरोघरीच्या गृहिणी अर्थशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाचे पालन करणार्‍या आहेत. वॉरेन बफेट यांच्यासारखा जगप्रसिद्ध अब्जाधीश आणि अर्थतज्ज्ञही 'डू नॉट सेव्ह व्हॉट इज लेफ्ट आफ्टर स्पेंडिंग, बट स्पेंड व्हॉट इज लेफ्ट आफ्टर सेव्हिंग.' म्हणजेच खर्चातून शिल्लक राहिलेल्या पैशांतून बचत करण्याचा विचार करण्यापेक्षा बचत करून शिल्लक राहिलेल्या पैशांतून खर्चाचे नियोजन करा, असा सल्ला देतात.

अमेरिकेतील प्रसिद्ध आंत्रप्रेन्युअर जॉन होप ब्रायंट हेदेखील 'यू कॅन मेक मनी टू वेज-मेक मोअर ऑर स्पेंड लेस.' म्हणजेच तुम्हाला अर्थसंचय करायचा असेल, तर भरपूर कमवा किंवा खर्च कमी करा, असे सांगतात. चाणक्यनीतीही भविष्यात येणार्‍या संकटांसाठी धनसंचय गरजेचा असल्याची शिकवण देते. त्यामुळेच पाश्चिमात्य प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत भारतामध्ये बचतीचे संस्कार अधिक खोलवर रुजले आहेत. वर्तमानातील उत्पन्नापेक्षा कमी खर्च करून केलेल्या बचतीतून भविष्य सुरक्षित करणे ही शहाणी व भारतीयांची ओळख आहे. 2008 च्या जागतिक आर्थिक मंदीच्या काळात पाश्चिमात्य देशांच्या अर्थव्यवस्था जेव्हा कोलमडत होत्या, तेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेला तारण्यामध्ये दोन महत्त्वाच्या घटकांचा समावेश होता. एक म्हणजे, भारतीयांची बचत आणि दुसरा म्हणजे, 'फॉरेन रेमिटन्स' अर्थात परदेशातील भारतीयांनी भारतात पाठवलेला पैसा. विशेष म्हणजे,

जी लेहमन ब्रदर्स दिवाळखोरीत निघाल्यानंतर जागतिक आर्थिक मंदीचे बिगुल वाजले, त्या लेहमनने दिवाळखोरी जाहीर केली तेव्हा त्यांचे भागभांडवल 600 अब्ज डॉलरहून अधिक होते. त्या काळात अमेरिकेत स्वस्त गृह कर्जवाटपाची लाट आली होती. जवळपास सर्वच अमेरिकी बँका, वित्तीय संस्था ग्राहकांना स्वस्त व्याज दरात, काही वेळा विनातारण गृह कर्ज देत होत्या. यातून गृह कर्जवाटपाचा प्रचंड अतिरेक झाला व ग्राहकांनी कर्ज फेडण्यास असमर्थता दर्शवताच सर्व बँका व लेहमन ब्रदर्स गटांगळ्या खाऊ लागले. त्यात छोट्या बँकांनी स्वत:ची दिवाळखोरी जाहीर केली व लेहमनला त्याचा मोठा फटका बसला.

अमेरिकेत 'लेहमन क्रायसिस'नंतर जी आर्थिक संकटांची मालिका सुरू झाली आणि नंतर जग मंदीच्या विळख्यात ढकलले गेले. या संकटाला अलीकडेच 15 वर्षे पूर्ण झाली. तळाशी जाऊन या संकटाचा विचार केल्यास, उत्पन्नापेक्षा अधिक खर्च हे त्याचे मूळ असल्याचे लक्षात येईल. अर्थात, पाश्चिमात्य जगातील नागरिकांचे आणि देशांचे अर्थकारण अशाच प्रकारे सुरू असते. नव्वदीच्या दशकात जागतिकीकरण झाल्यानंतर भारतातही हे पाश्चिमात्य चंगळवादी उधळपट्टीचे वारे वाहू लागले. त्यानुसार बँकांच्या कार्यपद्धती बदलत गेल्या. श्रीमंत होण्यासाठी कर्ज काढायला घाबरू नका, अशाप्रकारची मांडणीही केली जाऊ लागली. बचतीच्या रकमेवर ठेवीदारांना व्याज देण्यासाठी बँकांनीही कर्जपुरवठ्यासाठी असलेल्या अटी-शर्थी आणि नियमांमध्ये असणारा कठोरपणा कमी केला. कर्जावरील व्याज दर कमी करण्याची स्पर्धा सुरू झाली. या जोडीला नागरिकांना कर्जचक्रात आणण्यासाठी क्रेडिट कार्डच्या रूपाने बँकांच्या हाती एक नवे हत्यार आले. पाच-सात वर्षांपूर्वीपर्यंत क्रेडिट कार्ड हे केवळ श्रीमंतांच्या किंवा उच्चभ्रूवर्गातील, गलेलठ्ठ पगार असणार्‍या नोकरदारांच्या वॉलेटमध्येच दिसायचे; पण गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये सर्वच बँकांनी क्रेडिट कार्डवाटपासाठी स्वतंत्र विभाग तयार करून सर्वदूर याचा प्रसार केला.

'आज खर्च करा आणि 45 दिवसांनी पैसे द्या' हा क्रेडिट कार्डचा सर्वात मोठा यूएसपी असून, सर्वसामान्यांसह व्यावसायिक, उद्योजक, नोकरदारांना तोच सर्वाधिक प्रमाणात आकर्षित करणारा ठरला आहे. अर्थकारणाच्या चष्म्यातून पाहिल्यास क्रेडिट कार्डची ही सवलत खरोखरीच लाभदायक आहे. परंतु, त्याचा वापर चोखपणाने करणार्‍यांची आणि आज खर्च केलेल्या पैशांची 45 दिवसांत पूर्ण परतफेड करणार्‍यांची संख्या फारशी दिसत नाही; पण परतफेड करण्यास कार्डधारक असमर्थ ठरल्यास क्रेडिट कार्ड कंपन्यांकडून थकीत रकमेवर प्रचंड दराने व्याज आकारणी सुरू होते. त्यातून कार्डधारकाची थकीत रक्कम झपाट्याने वाढत जाते. यादरम्यान 'मिनिमम अमाऊंट ड्यू' नावाची सवलत कार्ड कंपन्यांकडून दिली जाते. प्रत्यक्षात तो चकवाच असतो. कारण, कंपन्यांकडून पैसे भरणा करण्यासाठी सुरू असलेल्या तगाद्यातून सुटका करून घेता येईल, असा विचार करून कार्डधारक ही रक्कम भरतो; पण उर्वरित रकमेवरील व्याज आणखी वाढत जाते आणि पाहता पाहता हा डोंगर काही हजारांवरून लाखांवर जातो. खर्च करताना आपल्याला आज पैसे द्यावे लागणार नाहीत, ही मानसिकता अधिक खर्चाला चालना देते आणि त्यातून अवास्तव, अनावश्यक खर्च केला जातो. तो करत असताना उत्पन्नाचा, परतफेडीचा विचार केला जात नाही. साहजिकच, एकदम पैसे देण्याची वेळ येते तेव्हा हतबलता निर्माण होते. अशा हतबल झालेल्यांची संख्या भारतात वाढत असल्याचे आरबीआयच्या ताज्या पाहणीतून समोर आले आहे.

रिझर्व्ह बँकेच्या एका आकडेवारीनुसार, एप्रिल 2023 मध्ये भारतातील क्रेडिट कार्डची एकूण थकबाकी 2 लाख कोटींवर गेली आहे. एप्रिल 2023 मध्ये हा आकडा 2 लाख 258 कोटी रुपये इतका होता. गतवर्षीच्या तुलनेत तो सुमारे 30 टक्क्यांनी अधिक आहे. इतिहासात पहिल्यांदाच क्रेडिट कार्डवरील थकबाकीचा आकडा 2 लाख कोटींच्या पार गेला असल्याने आरबीआयनेही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. भारतात एकूण लोकसंख्येपैकी 4.5 टक्के लोकांकडे म्हणजेच सुमारे 8.5 कोटी लोकांकडे क्रेडिट कार्ड आहेत. गतवर्षी हा आकडा 7.5 कोटी इतका होता. जगभरात लोकसंख्येच्या तुलनेत क्रेडिट कार्ड वापरणार्‍यांचे सर्वाधिक प्रमाण कॅनडा या देशात असून, तेथे 82 टक्के नागरिक क्रेडिट कार्ड वापरतात. इस्रायलमध्ये हे प्रमाण 79 टक्के आहे. अमेरिकेमध्ये हे प्रमाण 66.7 टक्के इतके आहे. या देशांच्या तुलनेने भारतातील क्रेडिट कार्डचा वापर नगण्य आहे. परंतु, यावरील थकबाकीचा आकडा चिंताजनक पातळीवर आहे. बँकांनी याबाबत चिंतेचे कारण नसल्याचे म्हटले असले, तरी नागरिकांच्या द़ृष्टीने विचार करता, काही बाबींची चिंता आहे. ही थकबाकी फेडण्यास देशातील क्रेडिट कार्डधारक सक्षम ठरतील का? ही परतफेड करेपर्यंत सुरू असणारा बँकांचा ससेमिरा पेलवण्याची क्षमता त्यांच्यापैकी किती जणांच्यात आहे?

तीन-चार हप्ते थकवल्यास कार्डधारक कंपन्यांकडून केल्या जाणार्‍या कायदेशीर कारवाईची वेळ आल्यास त्याला हे कार्डधारक कसे सामोरे जातील?

मुळात क्रेडिट कार्ड घेण्याचे फॅड केवळ चंगळवादी मानसिकतेतून वाढते आहे की, उत्पन्न आक्रसत चालल्यामुळे जीवनशैलीचा स्तर कायम राखण्यासाठी हा पर्याय स्वीकारला जात आहे, हा यातील कळीचा प्रश्न आहे. आज मध्यमवर्गीय नोकरदारांच्या 'जीवनावश्यक' वस्तूंच्या यादीत टी.व्ही., फ्रीज, वॉशिंग मशिन, मायक्रोवेव्ह, फूड प्रोसेसर, बाईक, कार, ए.सी., स्मार्टफोन, संगणक, लॅपटॉप यासारख्या गोष्टींची भर पडलेली दिसते. बाजारात या सर्व वस्तू कर्जावर उपलब्ध आहेत. याशिवाय विशिष्ट बँकांच्या क्रेडिट कार्डद्वारे त्यांची खरेदी केल्यास घसघशीत सवलत मिळते. त्यामुळे अनेक जण क्रेडिट कार्डचा वापर करून सणासुदीच्या दिवसांत या वस्तूंची खरेदी करून कुटुंबीयांना आनंद देतात; पण आर्थिक क्षमतेचा विचार न करता अशी उधळपट्टी केली असेल, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

क्रेडिट कार्ड जवळ बाळगणे ही आजवर प्रतिष्ठेची बाब मानली जात होती. परंतु, हळूहळू कर्जाचे हे मृगजळ परवडणारे नसल्याचे लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळे क्रेडिट कार्ड कशाला? असा विचार सुजाण, सुज्ञ मंडळींकडून केला जात आहे. ही संख्या मोजकी असेलही; पण ती आपल्या पारंपरिक विचारांशी सुसंगत आहे. आजच्या आधुनिक अर्थशास्त्राची मांडणीही उत्पन्न वजा बचत आणि उर्वरित रकमेतून खर्च अशीच केली जात आहे. येणार्‍या काळात क्रेडिट कार्डच्या क्षेत्रात नवीन कंपन्या दाखल होतील, विविध बँकांकडून नवनव्या ऑफर्स येत राहतील; पण खर्च करण्याच्या प्रवृत्तीवर नियंत्रण नसेल, तर अशा भूलभुलय्यापासून दूर राहणेच योग्य ठरेल. क्रेडिट कार्डची थकबाकी आपल्या सिबिल स्कोअरवरही प्रतिकूल प्रभाव टाकते आणि हा स्कोअर कमी होतो. याचा फटका आपल्याला कर्ज मिळण्यात अडचणींच्या रूपाने बसतो.

क्रेडिट कार्डचा योग्य वापर करून चांगली क्रेडिट हिस्ट्री निर्माण केली आहे. त्या जोरावर अनेक डिस्काऊंट घेतली आहेत, एवढेच नाही तर वेळेत क्रेडिट कार्ड बिल भरून त्या कंपन्यांकडून काही बक्षिसेही मिळवलेली आहेत. अर्थात, त्यासाठी थोडे नियोजन हवे. असे अनेक जण आहेत ज्यांनी मोठी खरेदी क्रेडिट कार्डवर केली, तेवढीच रक्कम बँकेत दीड महिना फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवली आणि योग्यवेळी रिपेमेंट करून बँकेतून व्याज मिळवले आणि वस्तूही काही दिवस आधी वापरली; पण हे काटेकोर नियोजन सर्वांना जमतेच असे नाही. चैन करायलाही हरकत नाही, शेवटी आपण मिळवतो कशासाठी? पण त्यालाही काही नियम लावले पाहिजेत. ही चैन उद्याच्या भविष्याला अंधारात टाकत नाही ना, याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या विविध प्रकारच्या खर्चासाठी आपण आपल्या उत्पन्नाचा किती भाग खर्च करणार आहोत, याचा विचार यासाठी फार महत्त्वाचा आहे. चैनीची व्याख्या खरे तर प्रत्येक पिढीनुसार बदलत असते. मोबाईल वापरणे किंवा स्वत:च्या गाडीने प्रवास करणे ही आजच्या जमान्यात चैन नाही, तर अनेकदा गरज बनलेली आहे; पण त्यातही आपले बजेट आणि आपण त्यासाठी किती खर्च करतोय, याचे गणित पडताळून पहायलाच हवे. 'चैन पडेना जीवा' अशी परिस्थिती उद्भवू द्यायची नसेल, तर चैनीच्या वस्तूंवर केला जाणारा खर्च आटोक्यात ठेवलाच पाहिजे. आजची बचत ही उद्याची चैन करायला मिळालेली पावती असते; पण त्यासाठी आज या चैनीला लांब ठेवले पाहिजे.

संतोष घारे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news