नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : नारायण मूर्ती यांनी नोकरीसाठी विप्रोमध्ये अर्ज केला होता. पण अझीम प्रेमजी यांनी छाननीत तो अर्ज नाकारला. त्यानंतरच मूर्ती यांनी इन्फोसिसची मुहूर्तमेढ रोवली, असे नारायण मूर्ती यांनीच उघड केले आहे.
एका मुलाखतीत त्यांनी इन्फोसिसच्या स्थापनेबाबत बोलताना आपल्या कारकिर्दीचा कालपट उलगडला. ते म्हणाले, मी प्रारंभी नोकरीच्या शोधात होतो. तेव्हा विप्रोत नोकरी करावी असे वाटत होते. मी तसा अर्जही केला होता. तेव्हा अझीम प्रेमजी विप्रोचे अध्यक्ष होते. त्यांनी माझा अर्ज नाकारला. बऱ्याच काळानंतर मी प्रेमजी यांना ही घटना सांगितली. त्यावेळी प्रेमजी यांनी तुम्हाला नोकरी न देऊन आपण सर्वात मोठी चूक केली, असे म्हटल्याचे मूर्ती म्हणाले. यानंतर आपणच कंपनी सुरू करावी, असा विचार मनात आला आणि इन्फोसिसची स्थापना झाली, असे मूर्ती यांनी मुलाखतीत म्हटले आहे. १९८१ मध्ये स्थापन झालेली इन्फोसिस आज आयटी क्षेत्रातील बडी कंपनी आहे. टीसीएस आणि विप्रो इन्फोसिसचे स्पर्धक आहेत.