पुणे, पुढारी वृत्तसेवा: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापिका डॉ. पूजा दोशी व त्यांचे विद्यार्थी नितीन कदम, युवराज काळे यांनी संशोधन करून 'डिझाइन इनोवेशन सेंटर'च्या माध्यमातून 'सिकलसेल अॅनेमिया' आजारावर 'हिमआधार' या आयुर्वेदिक औषधाची निर्मिती केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'रिसर्च पार्क फाउंडेशन'च्या माध्यमातून या आयुर्वेदिक औषधाची माहिती व व्यवसायीकरण करण्यात आले. इम्पॅक्ट 2.0 या कार्यक्रमात या औषधाबाबतची घोषणा करण्यात आली. या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील मुख्य नवोपक्रम अधिकारी डॉ. अभय जेरे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी डॉ. दोशी म्हणाल्या, 'मी स्वतः 'सिकलसेल अॅनेमिया' या आजाराची रुग्ण होते, त्यातूनच यावर औषध असावे, अशी कल्पना पुढे आली. जगात या आजाराचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या पाच टक्के आहे. भारत आणि नायजेरियात हे प्रमाण सर्वाधिक आहे. '
आपल्याकडे आयुर्वेद, योगशास्त्र याचा खूप मोठा ठेवा आहे. याला तंत्रज्ञानाची जोड देत आता ते जगासमोर मांडायची वेळ आली आहे. विद्यापीठाकडून झालेल्या या संशोधनाचा अभिमान आहेच; पण भविष्यात अशा प्रकारच्या संशोधनाला आमच्याकडून नेहमीच सहकार्य करण्यात येईल.
– डॉ. कारभारी काळे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ'हिमआधार'सारखे संशोधन हे पुढील काळातही विद्यापीठात व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अशा प्रकारे संशोधन होणे ही देशाची गरज आहे. विद्यार्थ्यांमधील नवोपक्रमाला आणि संशोधनाला पुढे नेण्यासाठी आविष्कार आणि रिसर्च पार्क फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यापीठ प्रयत्न करीत आहे.
– डॉ. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ