अयोध्येत आजपासून रामलल्ला प्राणप्रतिष्ठा महोत्सवारंभ

अयोध्येत आजपासून रामलल्ला प्राणप्रतिष्ठा महोत्सवारंभ
Published on
Updated on

अयोध्या; वृत्तसंस्था : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी स्थळावर उभारल्या जात असलेल्या भव्य श्रीराम मंदिराच्या गर्भगृहासाठी श्रीरामाच्या रामलल्ला या बालस्वरूपाच्या मूर्तीची निवड श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टतर्फे सोमवारी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली. मंगळवारपासून (दि. 16) प्राणप्रतिष्ठा महोत्सव सुरू होत असल्याचेही ट्रस्टकडून सांगण्यात आले.

गर्भगृहासाठी देशातील तीन नामवंत शिल्पकारांनी आपापल्या परीने श्रीराम बालस्वरूपातील 3 मूर्ती साकारल्या होत्या. त्यापैकी गर्भगृहासाठी म्हैसूर येथील वाडियार राजघराण्याचे पारंपरिक शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. बालस्वरूपातील उर्वरित दोन्ही मूर्तीही मंदिरात सामावून घेतल्या जाणार आहेत.

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही माहिती दिली. अयोध्येतील मंदिर निर्माण कार्यशाळेत ही परिषद झाली. राय म्हणाले, 22 जानेवारी रोजी दुपारी 12.20 ते 1 दरम्यान प्राणप्रतिष्ठेेचा मुख्य विधी होणार आहे. सोहळ्याचे मुख्य यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी, रा. स्व. संघप्रमुख मोहन भागवत आणि ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांची भाषणे यानंतर होतील. प्राणप्रतिष्ठेची वेळ काशीचे विद्वान गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी ठरवली आहे. वाराणसीचे महंत लक्ष्मीकांत दीक्षित प्राणप्रतिष्ठेचा विधी करतील, असेही राय म्हणाले. 20 आणि 21 जानेवारीला रामलल्लाचे दर्शन बंद करण्यात आले असून, मंगळवारपासून (16 जानेवारी) प्राणप्रतिष्ठेच्या विधीला सुरुवात होणार आहे. 21 पर्यंत विविध अनुष्ठाने होतील. मूर्तीचे पूजन, जलवास, अन्नवास, शय्यावास, औषधीवास आणि फळवास असे विधी पार पडतील.

रामलल्ला गुरुवारी गर्भगृहात

रामलल्लाच्या मूर्तीची गुरुवारी गर्भगृहात स्थापना करण्यात येईल. निवड झालेल्या रामलल्लाच्या मूर्तीचे वजन 150 किलोवर आहे. रामलल्लाची उभी मूर्ती बसवली जाईल. 18 जानेवारी रोजी गर्भगृहात मूर्ती स्थानापन्न केली जाईल.

सर्व भारतीय पंथांचे संत

शैव, वैष्णव, शीख, बौद्ध, जैन, कबीरमार्गी, इस्कॉनमार्गी, भारत सेवाश्रम संघमार्गी, रामकृष्ण मिशन, गायत्री परिवार, राधास्वामी, गुजरातचे स्वामी नारायण, वीर शैव लिंगायत संप्रदायातील मान्यवर संत सोहळ्याला उपस्थिती देतील, असेही राय यांनी स्पष्ट केले.

भारतातील सर्व नद्यांच्या पाण्याने होणार अभिषेक

भारतातील सर्व प्रमुख नद्यांचे पाणी अयोध्येत पोहोचले असून, रामलल्लाला अभिषेक या जलाने केला जाईल. नेपाळमधील रामाच्या सासुरवाडीतून (जनकपुरातून) तेसच आजोळ छत्तीसगडहून आलेल्या भेटवस्तू रामलल्लाला अर्पण केल्या जातील.

सायंकाळी दिवेलावणी

22 जानेवारीला संध्याकाळी 5.45 वाजता सूर्यास्त होईल. अयोध्येत यावेळी दिवे चेतविले जातील. देशभरातील लोकांनी यावेळी दिवे लावावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

मिले सूर मेरा तुम्हारा…

उत्तर प्रदेशातील बासुरी, ढोलक, छत्तीसगडचा तंबुरा, बिहारचे पखवाज, दिल्लीची सनई, राजस्थानचा रावणहत्ता, श्री खोळ अशी अनेक प्रकारची वाद्ये पूजेदरम्यान वाजवली जातील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news