कोल्हापूर ः अत्यंत विपरीत परिस्थितीत हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करण्याचे दिव्यत्व पार पाडणारे छत्रपती शिवाजी महाराज एक महान राम भक्त होते. 'रामराज्य' हेच त्यांचा आदर्श होते. परस्त्रीला माता मानणे, शेतातील गवताच्या काडीला नुकसान न पोहोचविणे, प्रजेला प्राथमिकता देणे ही धोरणे छत्रपती शिवाजी महाराजांनीही आपल्या राज्यकारभारात तंतोतंत अंगीकारली होती.
जिजाऊ माँसाहेबांनी बालपणापासून त्यांना 'रामायणा'तील कथा ऐकवल्या. रामायणाचे संस्कार महाराजांत खोलवर रुजलेले होते. इतिहासाची पाने चाळली, तर शिवाजी महाराजांच्या राम भक्तीचे अनेक दाखले डोळ्यांसमोरून तरळत जातात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने कवींद्र परमानंद यांनी 'शिवभारत' हा ग्रंथ लिहिला. शिवाजी महाराज बारा वर्षांचे असताना ते श्रुती, स्मृती, रामायण, महाभारत ग्रंथांतील ज्ञानात पारंगत होते, असे त्यातील एका अध्यायात नमूद आहे. जेधे आणि बांदल घराण्याने शिवाजी महाराजांना मोलाची साथ दिली. 'जेधे शकावली' या ग्रंथात, 'हनुमंत अंगद रघुनाथाला, जेधे बांदल शिवराजाला,' अशा ओळी आहेत. शाहिस्तेखान पुण्यावर चालून आला त्यावरील 'सभासद बखरी'त, शाहिस्तेखान म्हणजे कलियुगाचा रावणच, 'जैसी रावणाच्या संपत्तीची गणना न करवे, तैसाच बरोबरीचा खजिना,' असा उल्लेख शाहिस्तेखानाबद्दल यात आहे.
राजगड दुर्गाच्या एका माचीचे 'संजीवनी माची' असे नामकरण महाराजांनी केले होते. शिवकालीन अज्ञातदासांच्या पोवाड्यातून महाराजांच्या तोंडी, 'भ्यावे ते श्री रघुनाथास भ्यावे, तुम्हास (अफजलखानास) काय म्हणून,' असे वाक्य येते. केशवपंडित या पुरोहिताने 'रामायण' ऐकवल्याबद्दल संभाजी महाराजांनी त्यांना बक्षिसी दिली. दानपत्रात संभाजी महाराज म्हणतात, 'माझे वडील म्हणजे राजा दशरथ आणि त्यांचा मी मुलगा राम!'