नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, भाजपने आपल्या नेत्यांना पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त कोणीही केक कापू नयेत, अशा सक्त सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसादिवशी केक कटिंग आणि इतर धार्मिक विधी टाळावेत, असे निर्देश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिले आहेत.
मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान 'सेवा पंधरवडा' आयोजित करण्यात आला आहे. यादरम्यान रक्तदान शिबिरे, परिसंवाद, वृक्षारोपण आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी या कालावधीत होणाऱ्या कार्यक्रमांची यादी देणारे पत्र आधीच राज्यांना दिले आहे. पक्षाच्या राज्य प्रदेशाध्यक्षांना बूथ स्तरापर्यंत, कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचे, लोकांना भेटण्याचे आणि केंद्राद्वारे चालवल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांबद्दल बोलण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आपल्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी अहमदाबादमध्ये असतील. पंतप्रधान येथे आईचे आशीर्वाद घेतील आणि त्यानंतर ते मध्य प्रदेशला रवाना होतील. १७ सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात ८ चित्ते (५ मादी आणि ३ नर) सोडण्यात येणार आहेत. आफ्रिकन देश नामिबियातून हे चित्ते भारतात आणले जाणार आहेत. त्यांना १६ सप्टेंबर रोजी नामिबियाची राजधानी विंडहोक येथून विशेष विमानाने भारतात आणले जाईल. हे चित्ते जयपूरला येतील आणि त्यानंतर जयपूरहून हेलिकॉप्टरद्वारे कुनो नॅशनल पार्कमध्ये नेले जातील.
हेही वाचलंत का ?