जोतिबा देवस्थानसाठी प्राधिकरण

जोतिबा देवस्थानसाठी प्राधिकरण
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : जोतिबा देवस्थानच्या विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधनसभेत केली. विनय कोरे यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला ते उत्तर देत होते.

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जोतिबा देवस्थान परिसराच्या विकासासाठी तसेच जोतिबा डोंगराशी निगडित असलेल्या 23 गावांच्या विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात येईल व त्याला 50 कोटी रुपये निधी देण्यात येईल, अशी घोषणा यापूर्वीच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे सांगून हा प्रश्न मांडताना विनय कोरे म्हणाले की, आता सरकारने अन्य काही देवस्थानांसाठी प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा केली आहे. मात्र, जोतिबा देवस्थानसाठी एक पैसाही दिलेला नाही. जोतिबाला येणार्‍या भाविकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. हे पाहता या संपूर्ण परिसराच्या विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात यावे. यामुळे लाखो भाविकांची सोय होणार आहे.

त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जोतिबासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याबाबतच्या प्रस्तावाचे सादरीकरण आपण पाहिले आहे. खूप चांगल्या प्रकारे हा आराखडा तयार केला आहे. मात्र, प्राधिकरण स्थापन करण्यासाठी चार टप्पे पार करावे लागतील. पहिल्यांदा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने त्याला मंजुरी द्यावी लागेल. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती या प्रस्तावाला मंजुरी देईल.

त्यानंतर उच्चाधिकार समितीकडे हा प्रस्ताव येईल. तेथे त्याला मंजुरी मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती त्याला मंजुरी देईल. त्यानंतर प्राधिकरण अस्तित्वात येईल. स्थानिक पातळीवर तुम्ही ठरवले, तर जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंजुरीचे काम तुम्ही दोन-चार दिवसांत करू शकाल आणि शिफारस तातडीने उच्चाधिकार समितीकडे पाठवू शकता, असेही अजित पवार म्हणाले.

दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे जोतिबा प्राधिकरण स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जोतिबा परिसर विकासासाठी डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे योगदान

जोतिबा परिसराचा विकास करण्याची संकल्पना सर्वप्रथम 1990 मध्ये समोर आली. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी जोतिबा परिसर विकासासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली होती. त्याला कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यांतील खासदार, आमदार, वरिष्ठ अधिकारी, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनाही याचे निमंत्रण होते. मात्र, कार्यबाहुल्यामुळे ते या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. शरद पवार यांनी या बैठकीत परिसर विकासाचा विषय मांडताना, सरकारने जोतिबा परिसर विकासाचा आराखडा तयार केला आहे, त्याच्या अंमलबजावणीसाठी एक समिती नेमणे आवश्यक आहे. या समितीच्या अध्यक्षपदासाठी योग्य नाव सुचवावे, असा प्रस्ताव मांडला. यावर बैठकीस उपस्थित असलेल्या तत्कालीन खासदार बाळासाहेब माने, उदयसिंहराव गायकवाड, प्रकाश बापू पाटील, डॉ. डी. वाय. पाटील यांची नावे पुढे आली. त्यावर शरद पवार यांनी जोतिबा परिसार विकासाचा 5 कोटी रुपयांचा आराखडा आहे. सरकार त्यासाठी काहीही तरतूद करणार नाही. हा निधी तुम्हालाच उभारावा लागेल आणि त्यातूनच ही कामे करावी लागतील. निधी उभा करणे ही समितीची जबाबदारी राहील, असे जाहीर केले. त्यावर हे आम्हाला माहीत नव्हते, अशाप्रकारची प्रतिक्रिया सभागृहात उमटली.

तेव्हा बाळासाहेब माने यांनी, जोतिबा परिसर विकास समितीला राज्य सरकार निधी देणार, अशा समजुतीतून ही नावे पुढे आली होती. मात्र, एवढा मोठा निधी उभा करणे कोणाला जमेल, असे आपल्याला वाटत नाही. ही जबाबदारी पेलू शकेल अशी एकच व्यक्ती आहे; पण ती या बैठकीला उपस्थित नाही, असे सांगितले. त्यावर शरद पवार यांनी, ही व्यक्ती कोण? अशी विचारणा केली. तेव्हा बाळासाहेब माने यांनी 'पुढारी'कार बाळासाहेब जाधव असे उत्तर दिले.

त्यावर शरद पवार यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी या नात्याने आपल्याला 'पुढारी'कारांना फोन करा व बैठकीस येण्याची विनंती करा, असे सांगितले. त्यानंतर डॉ. प्रतापसिंह जाधव या बैठकीला आले. तेव्हा शरद पवार यांनी जोतिबा परिसर विकासाची संकल्पना मांडून त्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. यासाठी 5 कोटींचा निधी जमवावा लागेल आणि परिसर विकासाची सर्व कामे मार्गी लावावी लागतील, असेही पवार म्हणाले. त्यावर डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी निधी जमविण्याची जबाबदारी आपण घेऊ, विकासकामे शासकीय यंत्रणेमार्फत व्हावीत, असे स्पष्ट करत जोतिबा परिसर विकास समिती व जोतिबा परिसर विकास निधी समिती स्वतंत्र असावी.

निधी समितीची जबाबदारी आपण घेऊ, असे सांगितले. त्यानुसार हा प्रस्ताव मान्य झाला. पुढे 31 जानेवारी 1991 रोजी डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते जोतिबा डोंगरावर मुहूर्ताची पहिली कुदळ मारून जोतिबा परिसर विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय, परिसरात वनीकरण, शौचालय व स्नानगृह संकुल, सांडपाण्याची निर्गत, भक्तनिवास व पार्किंग, असा आराखडा तयार करून तो पूर्ण करण्यात आला. जोतिबा डोंगराला जाणारा एकच रस्ता होता. तेथे पर्यायी मार्ग तयार करण्यात आला. सर्वात मोठी अडचण ही जोतिबा ते यमाई मार्ग अशी होती. हा मार्ग केवळ दहा फुटांचा अरुंद होता. येथे चेंगराचेंगरी होत होती. ओबडधोबड दगडी पायर्‍या होत्या. याच मार्गावरून सासनकाठी व पालखी मिरवणूक जाते. हा मार्ग 32 फूट रुंद व सुव्यवस्थित अशा दगडी पायर्‍या करण्यात आल्या. त्याचबरोबर जोतिबा व यमाई मंदिर आवारात फरशी बसविण्यात आली. दीपमाळांचे स्थलांतर करण्यात आले. सेंटर प्लाझा व कमर्शियल कॉम्प्लेक्सची उभारणी करण्यात आली. भूमिगत विद्युतीकरण करून स्मृतिभवन उभारण्यात आले. अल्पकाळात 5 कोटींचा निधी जमविण्याचे काम डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी केले. निधीची रक्कम फार मोठी होती. मात्र, डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी मोठ्या जिद्दीने ती जमा केली. हे काम एवढे सोपे नव्हते. अन्य कोणाला हे शिवधनुष्य पेलता आले असते, असे आपल्याला वाटत नाही. मात्र, डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी ते लीलया उचलले.

– शिवाजीराव देशमुख,
तत्कालीन जिल्हाधिकारी तसेच जोतिबा परिसर विकास समितीचे अध्यक्ष

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news