ब्रिस्बेन ; वृत्तसंस्था : जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली (Australia Vs England) ऑस्ट्रेलिया बुधवारपासून सुरू होणार्या अॅशेस मालिकेपासून आपल्या नवीन क्रिकेट युगाची सुरुवात करेल. तर, इंग्लंडच्या नजरा या 11 वर्षांपूर्वीच्या आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या असणार आहेत.
दोन्ही संघांसाठी ऐतिहासिक अॅशेस मालिकेची सुरुवात चांगली राहिलेली नाही. इंग्लंडचा संघ वर्णभेदी टीकेच्या पार्श्वभूमीवर येथे पोहोचला आहे. तर, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनला कर्णधारपद सोडावे लागले. यासोबतच तो अनिश्चित काळासाठी क्रिकेटपासून दूर गेला. यासोबतच खराब वातावरणामुळे दोन्ही संघांना पुरेसा सरावदेखील करता आलेला नाही. या सर्व गोष्टींना मागे टाकत दोन्ही संघांचा प्रयत्न आता मालिकेवर लक्ष केंद्रित करण्याचा असणार आहे. ((Australia Vs England))
ऑस्ट्रेलियन संघाने कमिन्सला कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. 1956 नंतर पहिल्यांदा जलदगती गोलंदाज ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणार आहे. पेन गेल्याने अॅलेक्स कॅरीला कसोटी क्रिकेट पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या आक्रमणात चारही गोलंदाजांचा समावेश आहे. ज्यांनी चार वर्षांपूर्वी 4-0 अशा विजयात निर्णायक भूमिका पार पाडली होती.
मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड नवीन चेंडूने गोलंदाजी करतील. कमिन्सची साथ त्यांना मिळेल. तर, स्पिनर नॅथन लायनकडेदेखील नजरा असतील. ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच आपली अंतिम एकादश घोषित केली आहे. डावाची सुरुवात डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस करतील. मार्नस लाबुशेन आणि अनुभवी स्टिव्ह स्मिथ मध्यक्रमात संघाची जबाबदारी संभाळतील. ट्रॅविस हेडलादेखील संघात स्थान मिळाले आहे.
इंग्लंड संघाने ऑस्ट्रेलियामध्ये शेवटची मालिका 2010-11 मध्ये 3-1 अशी जिंकली होती. जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्यावर संघाच्या गोलंदाजी आक्रमणाची धुरा असेल. अँडरसनला पहिल्या कसोटीसाठी विश्राम देण्यात आला आहे. त्यामुळे ब्रॉड, मार्क वूड, ख्रिस वोक्स आणि ओली रॉबिन्सन जबाबदारी सांभाळतील. इंग्लंडला मालिका जिंकायची झाल्यास रोरी बर्न्स आणि कर्णधार जो रूटला चांगली कामगिरी करावी लागेल.
संघ पुढीलप्रमाणे : (Australia Vs England)
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लाबुशेन, स्टिव्ह स्मिथ, ट्रॅविस हेड, कॅमरून ग्रीन, अॅलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवूड.
इंग्लंड : रोरी बर्न्स, हसीब हमीद, जॉक क्राऊली, डेव्हिड मलान, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ओली पोप, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर (यष्टिरक्षक), डॉम बेस, ख्रिस वोक्स, ओली रॉबिन्सन, मार्क वूड, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच.