पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशचा ५ गडी राखून पराभव करत ऑस्ट्रेलियाने सलग सातवा सामना जिंकला. या विजयासह कांगारू संघाने आयसीसी (ICC) महिला एकदिवसीय विश्वचषक २०२२ च्या गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले. आता सेमीफायनमध्ये त्यांचा सामना चौथ्या क्रमांकाच्या संघाशी होणार आहे. (AUSW vs BANW)
पावसाने प्रभावित झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने निर्धारित ४३ षटकांत ६ गडी गमावून १३५ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ३२.१ षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात १३६ धावा केल्या आणि सामना खिशात टाकला. बेथ मुनीला तिच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. (AUSW vs BANW)
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीस मैदानात उतरलेल्या बांगलादेश संघाच्या मुर्शिदा खातून आणि शर्मीन अख्तर या जोडीने पहिल्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केली. ही जोडी अॅश्ले गार्डनरने तोडली. तिने मुर्शिदा खातूनला (१२) माघारी धाडले. ४८ धावांवर बांगलादेशला दुसरा धक्का फरझाना हकच्या (८) रूपात बसला. त्यानंतर शर्मीन अख्तर (२४), लता मंडल (३३), सलमा खातून (१५*) धावा करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे बांगलादेशने ४३ षटकात ६ बाद १३५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ॲशले गार्डनर आणि जेस जोनासनने २-२ बळी घेतले. (AUSW vs BANW)
१३६ धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खूपच खराब झाली. सलमा खातूनच्या घातक गोलंदाजीसमोर कांगारू संघाने २६ धावांत ३ आणि ४१ धावांत ४ विकेट गमावल्या. तर ७० धावांवर पाचवा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाच्या स्टार फलंदाज एलिसा हिली १५ आणि रॅचेल हेन्स ७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतल्या. तर मागील सामन्यात शतक झळकावणाऱ्या कर्णधार मेग लॅनिंगला सलमाने खाते उघडण्याची संधीही दिली नाही. ताहलिया मॅकग्राही ३ धावा करून बाद झाली. पडत्या विकेट्समध्ये बेथ मुनीने संयमी फलंदाजी करत आपले अर्धशतक (७५ चेंडूत ६६* धावा) पूर्ण केले. मुनीला अॅनाबेल सदरलँड (नाबाद २६) हिची चांगली साथ मिळाली. दोघींमध्ये ६६ धावांची भागिदारी झाली आणि संघाला विजय मिळवून दिला.