औरंगजेबला देशोधडीला लावणारा ‘किल्लेे विशाळगड’!

औरंगजेब
औरंगजेब

कोल्हापूर, सुनील कदम : 6 जून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन, तमाम मराठी मुलुखाची मान अभिमानाने उंचावणारा दिन! विशेष म्हणजे, नेमक्या याच दिवशी औरंगजेबाच्या पतनालाही सुरुवात झाली होती आणि त्याला कारण ठरले होते ती औरंगजेबाची विशाळगडावरील स्वारी! 6 जून 2023 रोजी या घटनेला 321 वर्षे पूर्ण होतील. स्वत:ला आलमगीर म्हणवणारा हा बादशहा विशाळगड मोहिमेनंतर अक्षरश: भिकेकंगालीच्या वाटेला लागला आणि अल्पावधीतच महाराष्ट्राच्या मातीत गाडला गेला.

छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने 1689 साली कपटाने पकडले आणि हालहाल करून त्यांना ठार मारले. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला असे वाटले की, आता जणू काही हिंदवी स्वराज्य बुडाले; पण त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती ताराराणी, सरसेनापती संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांच्यासह स्वराज्यातील झाडून सगळ्या सरदारांनी आणि मराठी फौजेने औरंगजेबाला पळता भुई थोडी करून टाकली. मराठी फौजेची सगळी ताकद त्यांच्या किल्ल्यांमध्ये असावी, असे वाटून 1699 साली औरंगजेबाने स्वत:च महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांविरुद्ध मोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यानच डिसेंबर 1701 मध्ये औरंगजेबाने आपल्या प्रचंड फौजेसह विशाळगडावर हल्ला केला.

औरंगजेबाने जवळपास सहा महिने विशाळगड किल्ल्याभोवती वेढा टाकला होता; पण किल्लेदार परशुराम पंतप्रतिनिधी आणि त्यांच्या मावळ्यांनी तितक्याच निकराने औरंगजेबाच्या सैन्याचा मुकाबला केला. शेवटी तहाची बोलणी होऊन 6 जून 1702 रोजी मराठी फौजेने औरंगजेबाकडून अभयदान, रोख दोन लाख रुपये, राहुट्या आणि तंबूंचे साहित्य वगैरे घेऊन किल्ला त्याच्या ताब्यात दिला. औरंगजेबाने किल्ला तर ताब्यात घेतला; पण याच किल्ल्यावर जणू काही औरंगजेबाच्या पतनाचा पाया रचला गेला.

विशाळगड ताब्यात घेतल्यानंतर आरंगजेबाने त्याचे नाव 'सरवरलाना' असे ठेवले आणि 10 जून 1702 रोजी पन्हाळ्याच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला, पण पावला-पावला दबा धरून बसलेल्या सह्याद्रीतील अक्राळविक्राळ दर्‍या, उंच कड्याकपारी आणि घनदाट अरण्य जणूकाही औरंगजेबाची वाटच पहात होते. तशातच मुसळधार पावसाला सुरूवात झाली आणि विशाळगड परिसरातील कडवी नदीसह छोट्या-मोठ्या ओढ्या-नाल्यांनी भयावह रूप धारण केले. प्रचंड वेगाने वाहणार्‍या या नदी-नाले-ओढ्यात आरंगजेबाचे अनेक हत्ती, उंट, घोडे आणि हजारो सैनिक वाहून गेले. महाराष्ट्रभर लुटमार करून औरंगजेबाने जमवलेली प्रचंड धनदौलत, एवढेच नव्हे तर आरंगजेबाचे आणि त्याच्या सरदारांचे तंबूसुध्दा या महापुरात वाहून गेले.

औरंगजेबाच्या सैन्यातील जगल्या वाचलेल्या जनावरांना चारापाणी मिळेना, साधे सैनिकच काय पण औरंगजेबाच्या सैन्यातील अमीर-उमरावांचीही अन्नान्न दशा झाली. पाच-सहा महिने सैनिकांना पगार नसल्यामुळे मेलेल्या माणसावर कफन घालायला की त्यांचे दफन करायला कुणी तयार होईना. त्यामुळे छावणीच्या परिसरात मेलेल्या जनावरांची आणि सैनिकांची सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. कसेतरी जीव वाचवून पन्हाळगडापर्यंत पोहोचायला औरंगजेबाला आणि त्याचा सैन्याला तब्बल 37 दिवस लागले. पण विशाळगड मोहिमेने औरंगजेबाची कंबर खचली ती कायमचीच.

छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज यांच्यानंतर काही काळ रामचंद्रपंत अमात्य यांनी याच किल्ल्यावरून स्वराज्याच्या कारभाराची धुरा हाकली होती. या काळात विशाळगडला राजधानीचाच दर्जा होता. या गडकोटाचा महान इतिहास विचारात घेता ऐतिहासिक दृष्टीकोनातून त्याचे संवर्धन होण्याची आवश्यकता आहे.

मराठ्यांविरुद्धच्या मोहिमेत औरंगजेब झाला लंगडा!

1699 साली औरंगजेबाने गड-किल्ले ताब्यात घेण्याची मोहीम सुरू केली आणि एक-एक किल्ला ताब्यात घेण्याचा सपाटा लावला. याच माहिमेदरम्यान 1 ऑक्टोबर 1700 रोजी औरंगजेबाची छावणी सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातील माण नदीच्या वाळवंटात पडली होती. त्या रात्री अचानक माण नदीच्या वरील पाणलोट क्षेत्रात बेफाम पाऊस झाला आणि मध्यरात्री माण नदीला महापूर आला. औरंगजेबाच्या छावणीत महापूर शिरताच सगळीकडे आरडाओरडा आणि गोंधळ उडाला. गाढ झोपेत असलेल्या औरंगजेबालाही काही समजायच्या आत त्याच्या तंबूत पाणी शिरले. जीव वाचविण्यासाठी बादशहा अंधारातच पळत सुटला आणि एका दगडावर जोरदार आपटला, त्याच्या गुडघ्याची वाटी फुटली आणि औरंगजेब आयुष्यभरासाठी लंगडा झाला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news