औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद येथील एक प्रसिद्ध अल्पवयीन यूट्युबर शुक्रवारी (दि.९) दुपारपासून अचानक बेपत्ता झाली. कुटुंबियांनी तिचा शोधा घेतला, परंतु ती कुठेही न सापडल्याने त्यांनी छावणी पोलिसांकडे धाव घेतली. मुलीच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छावणी पोलिस सायबर पोलिसांच्या मदतीने शोध घेत आहेत.
औरंगाबाद येथील पडेगाव परिसरात राहणारी अल्पवयीन तरुणी काव्या हिने अनेक दिवसांपासून 'बिंधास्त काव्या' नावावे युट्यूब चॅनेल सुरू केले होते. ती विविध विषयांवर व्हिडिओ करून, युट्यूबर टाकत होती. तिच्या व्हिडिओंना फॉलोअर्सकडून भरभरून प्रतिसाद मिळत होता. आजघडीला तिचे ४३ लाखांपेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत.
दरम्यान ती गेल्या दोन दिवसांपासून घरातून अचानक बेपत्ता झाल्याने, तिचे कुटुंबिय चिंतेत आणि गोंधळलेल्या स्थितीत आहेत. त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु, ती सापडली नसल्याने तिच्या आईने छावणी पोलिस ठाण्यात धाव घेऊन ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरून छावणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत केला आहे.
तिच्या आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ती आतापर्यंत कधीच इतका वेळ घराबाहेर राहत नव्हती. ती गेल्या तीन दिवसांपूर्वी रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने आम्ही तिचा शोध घेतला. परंतु, ती सापडली नाही. काव्याने तिचा मोबाईलही घरीच ठेवला असून, तिने फक्त दोन हजार रुपये सोबत नेल्याची माहिती तिच्या आईने पोलिसांना दिली असल्याचे, समोर आले आहे.
सायबर पोलिसांच्या मदतीने शोध
दरम्यान या प्रकरणी छावणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून सायबर पोलिसांच्या मदतीने बेपत्ता यु ट्यूबरचा शोध घेण्यात येत आहे.
-शरद इंगळे, पोलिस निरीक्षक छावणी पोलिस स्टेशन