औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवीधर गटातील अधिसभेच्या १० जागांसाठी आज (दि. २६) चार जिल्ह्यांत दुपारी १२ वाजेपर्यंत संथ गतीने मतदान झाले. पहिल्या चार तासांत केवळ १५ टक्के मतदान झाले असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.
विद्यापीठातील पदवीधर गटातील १० जागांसाठी औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांतील विविध ५१ केंद्रांवरील ८२ बुथवर मतदान होत आहे. सकाळच्या सत्रात मतदारांनी मतदानासाठी अत्यल्प प्रतिसाद दिला. चारही जिल्ह्यांत बारा वाजेपर्यंत केवळ १५ टक्के मतदान झाले. दुपारनंतर मतदानाला गती मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी औरंगाबाद जिल्ह्यात १७ हजार ७६५, बीड जिल्ह्यात १२ हजार ५९३, जालना जिल्ह्यात ३ हजार ९९३ तर उस्मानाबाद जिल्ह्यात २ हजार ५३१ असे एकूण ३६ हजार ८८२ मतदार आहेत.
मतदानासाठी शहरातील विविध मतदान केंद्राबाहेर उत्कर्ष, विद्यापीठ विकास मंच, परिवर्तन पॅनल तसेच इतर पॅनलने बूथ लावले असून उमेदवार, मतदान प्रतीनिधी, राजकीय नेतेमंडळी हजेरी लावून मतदानाची परिस्थिती जाणून घेत आहेत. या निवडणुकीत मतदारांना प्राधान्यक्रम लिहून मतदान करायचे असल्याने ते कसे करावे हेही समजवण्यात पेन्डॉलमधील केंद्रावरील अनेक कार्यकर्ते व्यस्त आहेत.
मौलाना आझाद मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते १० या वेळेत मतदान केंद्रावरील पाच बूथवर २४५ तर १० ते १२ या वेळेत ५३४ मतदान झाले होते. या मतदान केंद्रावर विविध पक्षाचे नेत्यांनी आपापल्या पॅनलच्या पॅन्डॉलला भेट देऊन मतदानाचा आढावा घेतला. शहरातील इतर मतदान केंद्रांवरही सकाळच्या सत्रात धिम्या गतीने मतदान झाले.
दरम्यान, कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभाग, मिलिंद महाविद्यालय, सरस्वती भुवन महाविद्यालय व विवेकानंद महाविद्यालयातील मतदान केंद्रांना भेट दिली. प्र-कुलगुरु डॉ. श्याम शिरसाट यांनी शहरातील वसंतराव नाईक महाविद्यालय, छत्रपती महाविद्यालय व मौलाना आझाद महाविद्यालयातील केंद्रांना भेट देऊन मतदानाचा आढावा घेतला.