औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीस विलंब होत असून तपासलेल्या उत्तरपत्रिकाही वेळेवर मंडळात जमा केल्या जात नाहीत. इतर मंडळाच्या तुलनेत औरंगाबाद मंडळाचे काम मागे असल्याचे निदर्शनास आले आहे. आता ज्या शाळेचे शिक्षक वेळेवर उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण करणार नाहीत, अशा शाळेच्या तसेच महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात येणार आहे, असा आदेश शिक्षण उपसंचालकांनी काढला आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. १२ वीची परीक्षा ४ मार्चपासून तर १० वीची परीक्षा १५ मार्चपासून सुरु झालेली होती. संबंधित विषयाची परीक्षा संपल्यानंतर साधारणतः २१ दिवसानंतर उत्तरपत्रिकांचे परीक्षण व नियमन करून संबंधित विषयाची उत्तरपत्रिका विभागीय मंडळात जमा करणे आवश्यक असते. तसे विषयनिहाय वेळापत्रकही या पूर्वीच मंडळाने जाहीर केलेले आहे. याबाबत ५ एप्रिल रोजी राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी ऑनलाईन सभेत आढावा घेतला असता औरंगाबाद विभागीय मंडळ वगळता उर्वरित सर्व मंडळांचे उत्तरपत्रिका तपासणीचे कामकाज वेळापत्रकाप्रमाणे ९० टक्के पूर्ण झाल्याचे निदर्शनास आलेले आहे.
औरंगाबाद मंडळाचे उत्तरपत्रिका तपासणीचे कामकाज विचारात घेता निकाल घोषित करण्यास विलंब होणार असल्याचे दिसते. विनाअनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित तत्वावरील शाळेचे शिक्षक उत्तरपत्रिका तपासणीस विलंब करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे संबंधित शाळेची व महाविद्यालयाची मंडळ मान्यता व मंडळ सांकेतांक गोठविण्याबाबत निश्चितच कारवाई करण्यात येईल, असे आदेश मुख्याध्यापकांना पत्रकाव्दारे शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत.
हेही वाचलंत का ?