Mamata Banerje : हा फक्त काँग्रेसचा पराभव, जनतेचा नाही, ममता बॅनर्जींचा टोला

Mamata Banerje : हा फक्त काँग्रेसचा पराभव, जनतेचा नाही, ममता बॅनर्जींचा टोला

पुढारी ऑनलाईन डेस्क : Mamata Banerjee : राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवामुळे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत खळबळ निर्माण झाली आहे. काँग्रेसने एकट्याने निवडणूक लढवल्यामुळे मतांची विभागणी झाली आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला झाला, असे आघाडीतील मित्रपक्षांचे म्हणणे आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनीही आज काँग्रेसच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली. विधानसभेला संबोधित करताना त्याला म्हणाल्या की, हा काँग्रेसचा पराभव आहे, जनतेचा नाही. काँग्रेसने तेलंगणा राज्यात सत्ता मिळवली. पण ते मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान जिंकण्यात अपयशी ठरले. विरोधी आघाडी इंडियातील मित्र पक्षांनी जागा वाटपाचा प्रस्ताव सुचवला होता. काँग्रेसने त्या प्रस्तावानुसार जागावाटपावर काम केले असते तर निकाल वेगळा लागला असता. पण काँग्रेसने त्या रणनितीकडे दुर्लक्ष करत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला, जो त्यांना महागात पडला आणि मतांच्या विभाजनामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला, असे मत बॅनर्जींनी माडले.

ममतादीदींनी (Mamata Banerjee) सांगितले काँग्रेसच्या पराभवाचे कारण

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला. तीन राज्यांतील या विजयाचे शिल्पकार 'पंतप्रधान मोदी' असल्याचे अनेक जाणकार तज्ज्ञ सांगत आहेत. लोकसभा निवडणुकीत या राज्यातून भरघोस जागा मिळतील, ज्यामुळे नरेंद्र मोदींवर तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असा दावाही आतापासूनच केला जात आहे. मात्र, हे भाजपचे यश नसून काँग्रेसचे 'अपयश' असल्याचे मुख्यमंत्री ममता यांना वाटते. त्या म्हणाल्या की, 'काँग्रेसला हे समजायला हवे होते, जागावाटप लवकर पूर्ण होऊ शकते, हे मी काँग्रेसला वारंवार समजावून सांगितले होते. तसे झाले असते तर हा निकाल वेगळा लागला असता.'

2024 साठी ममतांनी कोणता 'मंत्र' दिला?

मध्य प्रदेशचे उदाहरण देत ममता बॅनर्जींनी स्पष्ट केले की, या राज्यात भाजपविरोधी शक्तींना एकवटण्यात काँग्रेसने अनास्था दाखवली. त्याची किंमत त्यांना चुकवावी लागली आहे. मध्य प्रदेशात अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने काँग्रेसकडे जागा मागितल्या होत्या पण कमलनाथ यांनी ते मान्य केले नाही. अखिलेश यांच्याशी समन्वय नसल्यामुळे मध्य प्रदेशात काँग्रेसला 71 जागा गमावाव्या लागल्या आणि त्याचा भाजपला फायदा झाला, असा दावाही त्यांनी केला.

तीन राज्यांतील पराभवानंतर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 6 डिसेंबर रोजी दिल्लीत भाजप विरोधी 'इंडिया' आघाडीची बैठक बोलावली होती. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार दार्जिलिंगमध्ये आधीच ठरलेल्या कौटुंबिक आणि प्रशासकीय कार्यक्रमांमुळे ममता स्वतः दिल्लीतील बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे तृणमूलकडून एक प्रतिनिधी पाठवण्यात येणार आहे. 6 तारखेला बाबरी मशीद विध्वंस दिनानिमित्त विविध पक्षांचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news