आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप रणनीती आखत आहे. भाजपने गेल्या तीन महिन्यांत तीन राज्यांचे मुख्यमंत्री बदलले. कर्नाटकात येडियुराप्पा यांना हटवून बसवराज बोम्मई यांना आणले. गुजरातमध्ये विजय रूपाणी यांची उचलबांगडी करून भूपेंद्र पटेल यांच्याकडे धुरा सोपविली. उत्तराखंडमध्ये त्रिवेंद्रसिंग रावत यांना बदलून पुष्कर धामी यांना आणले होते. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप रणनीती आखत आहे.
गुजरातमध्ये पटेल समाजाचा बोलबाला आहे. गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपच्या तोंडाला फेस आणला होता. त्यातच गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गृहराज्य असल्याने गुजरात गमावणे भाजपला कदापि परवडणारे नाही. विजय रूपाणी यांचे काम चांगले असूनही त्यांना आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि जातीय समीकरणे लक्षात ठेवून हटविल्याची चर्चा आहे. पटेल समाजातले धडाडीचे नेते व पहिल्यांदाच आमदार झालेले भूपेंद्र पटेल यांना भाजपने मुख्यमंत्रिपदाची संधी दिली. भूपेंद्र पटेल यांनी रूपाणी मंत्रिमंडळातल्या सर्व मंत्र्यांची गच्छंती करीत सर्व नवीन चेहरे घेत एक प्रकारचा जुगारच खेळला आहे. मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेतले नितीन पटेल यांनादेखील वगळण्याचे साहस भूपेंद्र पटेल यांनी केले. या मंत्रिमंडळातले अर्धे मंत्री पटेल आणि ओबीसी समाजातले आहेत. 24 पैकी प्रत्येकी सहा मंत्री या समाजाचे आहेत. पटेलांचे आरक्षण आंदोलन पुन्हा भडकू नये तसेच हार्दिक पटेल यांना आवरण्याची कसरत भूपेंद्र पटेल यांना करावी लागणार आहे. विजय रूपाणी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निवडणूक लढविली तर पक्षाचा पराभव अटळ असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाहणीत दिसल्याचीही वदंता आहे.
मध्यंतरीच्या काळात भाजप नेतृत्वाने हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना दिल्लीला पाचारण केले होते. त्यामुळे त्यांचीही खुर्ची डळमळीत असल्याची चर्चा उडाली होती. हरियाणाच्या राजकारणावर जाट समाजाचे वर्चस्व आहे. मात्र, गैरजाट मनोहरलाल खट्टर मुख्यमंत्री आहेत. शेतकरी आंदोलनाने खट्टर सरकारला भंडावून सोडले आहे. तथापि, हरियाणात निवडणुकीलाअद्याप तीन वर्षांचा कालावधी आहे. भाजप पुढील दहा वर्षांची रणनीती डोळ्यासमोर ठेवून आवश्यक तेथे बदल करत आहे. त्याचप्रमाणे युवा आणि महिला नेत्यांना संधी दिली जात आहे. कर्नाटकात काँगे्रस आणि निजदमधील असंख्य बंडखोर आमदारांना गळाला लावत येडियुराप्पा यांनी कर्नाटकमध्ये भाजप सरकार आणले; पण वाढत्या वयाबरोबरच असंतुष्ट नेत्यांमुळे येडियुराप्पा त्रस्त होते. अस्वस्थता ओळखून वेळीच भाजपने बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्रिपदी आणले. येडियुराप्पांप्रमाणेच बोम्मई हेही वीरशैव लिंगायत समाजातील आहेत.
पुढील वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांची विधानसभा निवडणूक आहे. काँग्रेसमध्ये प्रियांका गांधी-वधेरा यांनी उत्तर प्रदेशची जबाबदारी स्वतःकडे घेतली आहे. प्रियांका यांच्यासाठी उत्तर प्रदेशची निवडणूक सत्त्वपरिक्षा असणार आहे. उत्तर प्रदेशात मात्र सप-बसपला काँग्रेसमुळे दगाफटका होण्याची भीती आहे.
पंजाबमध्ये काँग्रेसला जबरदस्त धक्का
पंजाबमध्ये काँग्रेस नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आगामी काळात पक्षाची धुरा नवज्योतसिंग सिद्धू यांच्याकडे असणार आहे; पण अमरिंदर यांच्याशिवाय काँग्रेसला पंजाब जिंकता येणे महामुश्कील आहे. आम आदमी पक्षाचे पंजाबचे नेते भगवंत मान हे सर्वपरिचित चेहरा असले तरी त्यांना मुख्यमंत्री केले जाणार काय, याबद्दल साशंकता आहे. आप नेतृत्वाकडून माजी पोलिस महासंचालक एन. पी. एस. औलख, एस. पी. एस. ओबेरॉय, बलबीरसिंग सिचेवाल आदी नेत्यांना संधी दिली जात आहे. आपने उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी माजी कर्नल अजय कौटियाल यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित केले आहे. सप, बसप यांसारख्या प्रादेशिक पक्षांकडून नव्या दमाच्या चेहर्यांना संधी दिली जात आहे. आगामी दशकाच्या दृष्टीने केली जात असलेली ही बीजपेरणी त्या-त्या राजकीय पक्षांसाठी कितपत लाभदायक ठरणार, हे येणारा काळच ठरविणार आहे.