Asian Para Games : रक्षिता राजूची 1500 मीटर T11 स्पर्धेत ‘सुवर्णधाव’! भारताचे 14 वे गोल्ड मेडल

Asian Para Games : रक्षिता राजूची 1500 मीटर T11 स्पर्धेत ‘सुवर्णधाव’! भारताचे 14 वे गोल्ड मेडल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asian Para Games : चीनमधील हांगझोऊ आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने अप्रतिम कामगिरी करत पदकांचे अर्धशतक पूर्ण केले. भारताने आतापर्यंत एकूण 55 पदके जिंकली असून त्यात 14 सुवर्ण, 19 रौप्य आणि 22 कांस्य पदकांचा समावेश आहे. आज (दि. 25) बुधवारी स्पर्धेच्या तिस-या दिवशीही भारतीय खेळाडूंनी दमदार सुरुवात केली.

रक्षिता राजूचे 1500 मीटर T11 स्पर्धेत सुवर्णपदक (Asian Para Games)

रक्षिता राजूने महिलांच्या 1500 मीटर T11 स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. रक्षिताने 5 मिनिटे 21.45 सेकंदांमध्ये शर्यत पूर्ण करून सुवर्ण पदक पटकावले. तर ललिता किल्लाकाने 5 मिनिटे 48.85 सेकंद वेळेसह रौप्यपदक जिंकले.

अंकुर धामाचे सलग दुसरे 'सुवर्ण' (Asian Para Games)

तत्पूर्वी अंकुर धामाने पुरुषांच्या 1500 मीटर T11 मध्ये भारतासाठी आजही सुवर्ण कामगिरी केली. त्याने 4 मिनिटे 27.70 सेकंदांची वेळ घेत धाव पूर्ण केली आणि सुवर्ण पदकाला सलग दुस-या दिवशी गवसणी घातली. या आधी मंगळवारी (दि. 24) अंकुरने पुरुषांच्या 5000 मीटर T11 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.

तिरंदाजी स्पर्धेत रौप्य (Asian Para Games)

राकेश कुमार, सूरज सिंग यांनी पुरुष दुहेरी कंपाउंड ओपन सांघिक तिरंदाजी स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.

सुंदरसिंग गुर्जरचा 'गोल्डन थ्रो', भालाफेकीत नोंदवला जागतिक विक्रम!

चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची यशस्वी कामगिरी कायम आहे. बुधवारी सुंदरसिंग गुर्जरने पुरुषांच्या भालाफेक F46 स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. त्याने सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात 68.60 मीटर थ्रो करून श्रीलंकेच्या दिनेश प्रियंथाचा 67.79 चा मागील जागतिक विक्रम मोडीत काढला. तर याच स्पर्धेत रिंकूने 67.08 थ्रो करून मीटरसह रौप्य तर अजित सिंगने (63.52 मीटर) कांस्य पदकावर मोहोर उमटवली. यासह एकाच स्पर्धेच्या तीनही पदके जिंकून भारतीय खेळाडूंनी पोडियमवर कब्जा केला.

सुमित अंतिलचा विक्रमी 'सुवर्ण थ्रो'

सुमित अंतिलने पुरुषांच्या F-64 भालाफेक स्पर्धेत 73.29 मीटर अंतरावर भालाफेक करून विक्रम केला आणि सुवर्णपदक जिंकले. याच स्पर्धेत पुष्पेंद्र सिंगने कांस्यपदक पटकावले. भारताच्या हानीने पुरुषांच्या F-37/38 भालाफेक स्पर्धेत दुसरे सुवर्णपदक जिंकले.

रिकर्व्ह तिरंदाजीमध्ये रौप्य पदक

तर हरविंदर सिंग आणि साहिल यांनी पुरुषांच्या रिकर्व्ह तिरंदाजीमध्ये रौप्य पदकाची कमाई केली. पूजाने महिलांच्या डिस्कस थ्रो स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. तिरंदाजीच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत शीतल आणि सरिता यांना चिनी जोडीकडून पराभव पत्करावा लागला आणि त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

महिला टेबल टेनिसमध्ये कांस्य

महिला वर्ग-4 टेबल टेनिस स्पर्धेत भाविना पटेलला चीनच्या गु झियाओदानकडून पराभव पत्करावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. टेबल टेनिसमध्ये संदीप डांगीने पुरुष एकेरीत रौप्यपदक पटकावले. भारताच्या प्रमोद भगत आणि मनीषा रामदास या जोडीने मिश्र दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक, तर मनीषा जोशी आणि वैष्णवी यांनी बॅडमिंटन एकेरीत कांस्यपदक जिंकले. शशी कसानाने महिलांच्या डिस्कस थ्रोमध्ये कांस्यपदक पटकावले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news